कराड : शहराच्या हद्दवाढ झालेल्या भागाच्या विकासाचा एकही प्रश्न शिल्लक ठेवणार नाही. पाणी पुरवठा, भुयारी गटार योजनेसह सुमारे १९४ कोटी रुपयांचे काँक्रीटचे रस्ते प्रस्तावित करण्यात आल्याचे सांगताना, या भागाचा विकास करण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याची ग्वाही शिवसेनेचे स्थानिक नेते, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र यादव यांनी दिली.

शहराच्या वाढीव भागातील पाण्याच्या निचऱ्याची (ड्रेनेज लाईन) समस्या लक्षात घेऊन राजेंद्र यादव यांनी दौलत कॉलनीत भुयारी गटार योजनेच्या फेज दोनच्या कामाचा प्रारंभ केला, त्यावेळी ते बोलत होते. माजी नगरसेवक निशांत ढेकळे, शिवराज इंगवले, विनोद भोसले, प्रवीण पवार, विक्रम मोहिते आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

यादव म्हणाले, हद्दवाढ भागात घरे अगोदर झाली. नंतर मागणीप्रमाणे मुलभूत सुविधा होत आहेत. मात्र, यात एकसूत्रीपणा नसल्याने पाणी पुरवठा व पाणी वाहून जाण्याच्या (ड्रेनेज) तक्रारी निर्माण झाल्या. त्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून कराडला ३२५ कोटींचा निधी मंजूर झाला. यात सुमारे दोनशे कोटी रुपये हद्दवाढ भागासाठी असल्याने या भागाचा भविष्यात कायापालट होणार असल्याचा विश्वास यादव यांनी दिला.

हद्दवाढ भागात घनकचरा प्रकल्पाशेजारी ११ लाख लिटरची पाण्याची टाकी बांधण्यात येणार आहे. त्यामुळे कमी दाबाने होणाऱ्या पाण्याची समस्या संपुष्टात येईल. एकूणच हद्दवाढ भागात १९४ कोटींचे रस्ते प्रस्तावित केले आहेत. या रस्त्यांच्या दोन्ही बाजूला गटार असणार आहेत. २०५६ साली संपूर्ण शहराची लोकसंख्या गृहीत धरून पाणी योजना, भुयारी गटार योजनेची कामे होणार आहेत. त्यामुळे या भागात वेगाने नागरीकरण होईल, असे राजेंद्र यादव यांनी सांगितले.