कराड : स्वातंत्र्य दिनानिमित्त दर वर्षीप्रमाणे कोयना धरणाच्या भिंतीवरील वाहत्या पाण्यावर रंगीबेरंगी प्रकाश योजनेचा खेळ (‘लेझर शो’) रंगला. या रंगसोहळ्यासोबतच या पाण्याच्या पडद्यावर युनोस्को (जागतिक वारसा स्थळ) नुकत्याच निवडलेल्या हिंदवी स्वराज्याच्या १२ किल्ल्यांचेही दर्शनही घडवले जात होते. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येस रंगलेल्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा होत आहे. हे प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी मोठी गर्दी लोटली होती. उद्या (१५ ऑगस्ट) रात्री दहा वाजेपर्यंत हा प्रकाशरंग सोहळा सुरू राहणार आहे.
कोयना धरण परिसरात स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येस गुरुवारी ‘लेझर शो’चे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याचे आकर्षण वाढवण्यासाठी धरणाचे सहा वक्र दरवाजे बुधवारी सायंकाळी तिसऱ्यांदा उघडून धरणाच्या सांडव्यावरून पाण्याचा प्रवाह सुरू करण्यात आला. देशभक्तिपर गीते अन् त्यावर तिरंगी रंगांचा सुरेख खेळ लक्षवेधी ठरला आहे. ही प्रकाशयोजना पाहण्याची प्रत्यक्ष संधी पर्यटक व स्थानिकांना मिळाली आहे.
कोयना धरणाचा पाणीसाठा ८८.११ अब्ज घनफूट (टीएमसी, ८३.७१ टक्के) असताना काल बुधवारी रात्री साडेसात वाजता धरणाचे सहाही वक्र दरवाजे सहा इंच उघडून २,९०० घनफूट (क्युसेक) जलविसर्ग करून दुधासारख्या फेसाळणाऱ्या या पाण्यावर स्वातंत्र्य दिनानिमित्त दर वर्षीप्रमाणे कोयना धरणाच्या भिंतीवरील वाहत्या पाण्यावर रंगीबेरंगी प्रकाश योजनेचा खेळ (‘लेझर शो’) साकारण्यात आला आहे. देशभक्तिपर गीतांवर रंगलेल्या या प्रकाश योजनेच्या विलक्षण रंगीबेरंगी खेळाची समाजमाध्यमावर जणू धूमच राहिली. पाण्याचा अन् रंगीबेरंगी प्रकाशाचा संगम पाहताना लोक मंत्रमुग्ध होत आहेत.
या रंग प्रकाशाच्या खेळात पाण्याच्या पडद्यावर युनोस्कोने (जागतिक वारसा स्थळ) नुकत्याच निवडलेल्या १२ किल्ल्यांचेही दर्शन घडवले जात होते. राष्ट्रध्वज आणि किल्ल्यांचे असे दर्शन घेताना पर्यटकांसह स्थानिक मंत्रमुग्ध झाले होते. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येस रंगलेल्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा होत आहे. हे प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी मोठी गर्दी लोटली होती. उद्या (१५ ऑगस्ट) रात्री दहा वाजेपर्यंत हा प्रकाशरंग सोहळा सुरू राहणार आहे.