सांगली : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कोल्हापूरमधील बनावट नोटा तयार करण्याचा कारखाना उद्ध्वस्त करून एक कोटीच्या नकली नोटा जप्त केल्या. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आल्याची माहिती शुक्रवारी सायंकाळी पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी पत्रकार बैठकीत दिली. या बनावट नोटा चलनात आणण्याचा सूत्रधार कोल्हापूरमधील शाहूपुरी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला हवालदार असल्याचेही त्यांनी सांगितले.

बनावट नोटा तयार करणे, साठा करणे, चलनात आणणे या प्रकरणी पोलिसांनी हवालदार इब्रार आदम इनामदार (वय ४४, रा. कसबा बावडा, कोल्हापूर) याच्यासह सुप्रीत काडाप्पा देसाई (वय २२, रा. गडहिंग्लज, राहुल राजाराम जाधव (वय ३३, रा. लोकमान्यनगर कोरोची, ता. हातकणंगले), नरेंद्र जगन्नाथ शिंदे (वय ४०, रा. टाकळा, राजारामपुरी, कोल्हापूर) व सिद्धेश जगदीश म्हात्रे, (वय ३८, रा. मालाड, मुंबई) या पाच जणांना अटक करण्यात आली. या सर्वांना दि. १३ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे न्यायालयाने आदेश दिले असल्याचे श्री. घुगे यांनी सांगितले.

याबाबत अधिक माहिती देताना श्री. घुगे यांनी सांगितले, मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलिसांना निलजी-बामणी, कोल्हापूर रोड पुलाखाली एक व्यक्ती संशयास्पद असल्याची माहिती मिळाली. उप अधीक्षक प्रणिल गिल्डा, सहायक निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे उपनिरीक्षक रूपाली गायकवाड, पूनम पाटील, हवालदार सचिन कुंभार, अभिजित पाटील, सर्जेराव पवार, राहुल क्षीरसागर, नानासाहेब चंदनशिवे, बसवराज कुंदगोळ, राजेंद्र हारगे, अमोल तोडकर, विनोद चव्हाण यांच्या पथकाने संशयास्पद वावरत असलेल्या सुप्रीत देसाई याची झडती घेतली असता त्याच्याकडे पाचशेच्या ८४ नोटा आढळल्या. त्याने त्या चलनात आणण्यासाठी राहुल जाधव याच्याकडून घेतल्या होत्या. दोघांनाही अटक करून चौकशी केली असता बनावट नोटा तयार करण्याचा प्रकार उघडकीस आला.

यानंतर पोलिसांनी रूईकर कॉलनीमधील पोलीस कर्मचारी इनामदार याच्या कार्यालयात या बनावट नोटा तयार करण्यात येत असल्याचे समजले. यानुसार कार्यालयावर छापा टाकून नोटा तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे ठसे, लॅपटॉप, छपाई यंत्र जप्त करण्यात आले. तसेच या ठिकाणाहून ९८ लाख ४३ हजार ५०० दर्शनी मूल्याच्या पाचशे रुपयांच्या १९ हजार ६८७ बनावट नोटा, ८५ हजार ८०० रुपये मूल्यांच्या दोनशे रुपयांच्या ४२९ नोटा हस्तगत करण्यात आल्या. तसेच या ठिकाणी विना नोंदणीची १० लाखांची इनोव्हा मोटारही जप्त करण्यात आली आहे.

या टोळीने पहिल्यांदाच या नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न केला असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून, एकास तीन या प्रमाणे या बनावट नोटा चलनात आणल्या जात होत्या. एक हजार चलनासाठी बनावट तीन हजार रुपये देण्याचा सौदा म्हात्रे याच्याशी करण्यात आला होता, अशीही माहिती संशयितांनी दिली असल्याचे श्री. घुगे यांनी सांगितले. इतक्या मोठ्या प्रमाणावर बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रकार जिल्ह्यात पहिल्यांदाच पोलिसांनी उघडकीस आणला असून, ही यशस्वी कामगिरी करणाऱ्या पोलीस पथकाला बक्षीस देण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.