कराड : गेल्या तीन दिवसांपासून कोयना पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे कोयना धरणातून तब्बल ६८ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे कोयनेसह कृष्णा नदीला पूर आला असून नदीवरील अनेक पूल, रस्ते पाण्याखाली गेले आहेत. जोरदार पाऊस आणि नद्यांना आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रशासनाने नदीकाठच्या लोकांना दक्षतेचा इशारा दिला आहे.
गेल्या तीन दिवसांपासून पश्चिम घाट क्षेत्रासह कोयना पाणलोटात जोरदार पर्जन्यवृष्टी होत आहे. सोमवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. धरणात पाण्याची वेगाने मोठी आवक होत आहे. यामुळे आज सकाळी कोयनेचे सहा वक्री दरवाजे नऊ फुटांनी उघडून कोयना नदीपात्रात ६५,६०० क्युसेक तर, पायथा वीजगृहातून २,१०० असा एकूण ६७ हजार ७०० क्युसेकचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. याशिवाय सातारा जिल्ह्यातील धोम धरणातून ८,६५९ क्युसेक, ‘कण्हेर’मधून ६,४८५ क्युसेक, ‘उरमोडी’तून ३,३०५ क्युसेक, ‘तारळी’तून २,८०४ क्युसेक असा जलविसर्ग करण्यात येत असल्याने कृष्णा- कोयनेसह त्यांच्या उपनद्यांनाही पूर आला आहे. या नद्यांकाठच्या लोकांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झाले असून आपत्कालीन उपाययोजना सुरू केल्या आहेत.
कोयनेच्या दरवाजातील मोठ्या जलविसर्गामुळे पाटण तालुक्यातील मुळगाव पूल पाण्याखाली गेला आहे. मुसळधार पावसामुळे कोयना धरणातील पाण्याचे आवक झपाट्याने वाढल्याने पूरस्थिती नियंत्रणाच्या सध्या हालचाली दिसत आहेत. सोमवारी रात्री कोयना पाणलोटात तुफानी पाऊस झाल्यानंतर आज मंगळवारी सकाळी ११ वाजता धरणाचे सहा वक्र दरवाजे आठ फुटांवरून नऊ फुटांपर्यंत उघडण्यात आले. आणि कोयनेतून कालच्या तुलनेत थेट दुप्पटहून अधिक असा ६५,६०० क्युसेकचा जलविसर्ग सुरु झाला. तर, पायथा विद्युत गृहातून २,१०० क्युसेक असा एकूण ६७ हजार ७०० क्युसेकचा एकूण विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू आहे. या प्रचंड जलविसर्गामुळे कोयना नदीला पुढे कृष्णा नदीलाही पूर आला आहे. अशातच पाटण तालुक्यातील नवजा ते कोयनानगर दरम्यान, पाबळ नाला येथे रस्ता खचल्याने तेथील वाहतूक बंद करण्यात आली आहे.
कोयना भागातील गोवारे येथील पूल पाण्याखाली गेल्याने कोयना भागातील दुर्गम गावांचा संपर्क तुटला आहे. तसेच कोयना नदीवरील मुळगाव पूल पाण्याखाली गेल्याने मुळगाव, त्रिपुर्डी, कवरवाडी, चोपडी या गावांचा पाटणशी संपर्क तुटला आहे. मोरणा- भागाला जोडणाऱ्या नेरळे पुलाला पाणी लागल्याने येथून वाहतुक बंद करण्यात आली आहे. कोयना पाटण रस्त्यावर रासाठी या ठिकाणी झाड पडल्याने वाहतुकीस अडथळा झाला होता. परंतु प्रशासनाने तात्काळ वाहतूक सुरळीत केली आहे. अतिवृष्टीमुळे पाटण तालुक्यातील शाळांना सुट्टी दिल्याचे गटशिक्षणाधिकारी दीपा बोरकर यांनी जाहीर केले आहे.