सांगली : आजोबांबरोबर शेतात गेलेल्या चार वर्षांच्या मुलाला उसात बिबट्याने फरपटत नेण्याचा प्रकार सोमवारी सायंकाळी गिरजवडे (ता. शिराळा) येथे घडला. मात्र, प्रसंगावधान दाखवत एका शेतकऱ्याने धाडस करून बिबट्याच्या तावडीतून या बालकाची सुटका केली. या मुलावर सध्या कराडमधील कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

गिरजवडे (ता. शिराळा) गावाच्या शिवारातील मुळीकवाडी येथील बजरंग मुळीक हे शेतात वैरण आणण्यासाठी गेले होते. त्यांच्यासोबत नातू आरव अमोल मुळीक (वय ४) हा मुलगा आणि काशीनाथ मुळीक, शोभा मुळीक, राजश्री मुळीक हेही होते. वैरण काढून घरी परतत असताना रानातील पाऊलवाटेकडे असलेल्या एका झाडा आड बिबट्या लपला होता. हे सर्वजण पाऊलवाटेने जात असताना बिबट्याने झडप मारून मुलगा आरव याला जबड्यात पकडून फरपटत नेले.

यावेळी सोबत असलेल्या काशीनाथ मुळीक यांनी बिबट्यापाठोपाठ उसाच्या फडात शिरून बिबट्याच्या तावडीतून बालकाची सुटका केली. आरडाओरडा ऐकून बिबट्याने बालकाची सुटका केली. मात्र, यावेळी सुटकेसाठी प्रयत्न करणाऱ्या काशीनाथ मुळीक यांच्यावर झडप घातली. ती त्यांनी चुकवली असली तरी किरकोळ दुखापत झाली.

दरम्यान, जखमी आरवला शिराळा जिल्हा उपकेंद्रात उपचारासाठी नेण्यात आले. याठिकाणी डॉ. अनिरुद्ध काकडे, डॉ. मनोज महिंद यांनी प्राथमिक उपचाार केल्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी कराडमधील कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, या घटनेची माहिती सरपंच सचिन देसाई यांनी वन विभागाला दिली. मंगळवारी विश्वास सहकारी साखर कारखान्याचे संचालक युवा नेते विराज नाईक यांनी वन कर्मचाऱ्यांसोबत पाहणी केली. घटनास्थळी बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले आहेत. बिबट्याकडून पाळीव प्राण्यासोबतच लहान मुलांनाही लक्ष केले जात असून, याबाबत वन विभागाने लोकांचे प्रबोधन करणे गरजेचे असून, बिबट्यापासून बचाव करण्यासाठी काय उपाययोजना करावी, याची माहिती नागरिकांना द्यावी, बिबट्याचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी श्री. नाईक यांनी यावेळी वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडे केली.

शिराळा तालुक्यातील गिरजवडे, पणुंब्रे या गावासह वाळवा तालुक्यातील काही गावात बिबट्याचे दर्शन वारंवार होत असून, लोकवस्तीतील पाळीव प्राणी हे बिबट्याचे प्रामुख्याने लक्ष बनले आहे. उसाच्या फडात बिबट्याचे आश्रयस्थान असल्याने भक्ष्य शोधासाठी लोकवस्तीमध्ये बिबट्या धाव घेत आहे. सध्या शेतात भात काढणीची कामे सुरू असून, शेतकरी बिबट्याच्या हल्ल्याच्या भीतीने ग्रासला आहे.

डोंगराकडेला असलेल्या वस्तीवरील शेळ्या, कुत्रे यांच्यावर बिबट्याचे वारंवार हल्ले होत असून, नागरिक बिबट्याच्या दहशतीखाली आहेत. वन विभागाने एकट्या दुकट्याने रानात काम न करता समूहाने करावे, आवाज करत काम करावे, असे आवाहन केले आहे.