रत्नागिरी – कोंबड्यांच्या पोल्ट्रीमध्ये अडकलेल्या बिबट्याला वनविभागाच्या बचाव पथकाने पिंजरा लावून पकडले. त्यानंतर या बिबट्याची वैद्यकीय तपासणी करुन त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

संगमेश्वर तालुक्यातील तुरळ सांगडेवाडी येथे रविवारी सकाळी साडे सात वाजण्याच्या दरम्याने मधुकर चव्हाण यांचे राहत्या घराचे मागे असलेल्या कोंबड्याच्या पोल्ट्री मध्ये बिबट्या वन्यप्राणी शिरला. या बाबतची माहिती जितेंद्र चव्हाण यांनी वन विभागाच्या अधिका-यांना दिली. माहिती मिळताच वन विभागाच्या बचाव पथकाने पिंजरा व इतर साहित्यासह जागेवर जाऊन खात्री केली असता बिबट्या कोंबड्याचे पोल्ट्री मध्ये अडकलेला आढळून आला. त्याला पकडण्यासाठी कोंबड्याचे पोल्ट्री फार्मचे सभोवार योग्य ती खबरदारी घेऊन शेडनेट लावण्यात आले.

कोंबड्याचे पोल्ट्रीचे मुख्य दरवाजाच्या तोंडावर पिंजरा लावून अडीच तासांचे अथक प्रयत्नानंतर बिबट्यास सुरक्षित रित्या पिंजऱ्यात पकडण्यात आले. या बिबट्याची पशुवैद्यकीय अधिकारी कडवई श्री.बेलोरे यांचे कडून वैद्यकीय तपासणी करून बिबट्या तंदुरुस्त असल्याने त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

यावेळी घटनास्थळी परीक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी प्रकाश सुतार, परिमंडळ वन अधिकारी न्हाणू गावडे, वनरक्षक साखरपा सहयोग कराडे, वनरक्षक फुणगूस आकाश कडुकर, वनरक्षक दाभोळे सुप्रिया काळे वनरक्षक जाकादेवी, शर्वरी कदम वनरक्षक कांदळवन कक्ष रत्नागिरी, किरण पाचारणे वनरक्षक आरवली, सुरज तेली वनरक्षक वनउपज तपासणी नाका साखरपा, रणजीत पाटील, प्राणी मित्र महेश धोत्रे, निसर्गमित्र अनुराग आखाडे, संदीप गुरव, संदीप उजगावकर यांच्यासह पोलीस निरीक्षक संगमेश्वर श्री. चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक श्री. गावित, हेड कॉन्स्टेबल श्री. जाधव श्री. अरुण वानरे, पोलीस कॉन्स्टेबल श्री. लोखंडे व श्री. खाडे हे उपस्थित होते.