सांगली : नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर शिराळ्यातील २१ अर्जदारांना केवळ शैक्षणिक उद्देश आणि स्थानिक लोकामध्ये सर्प संवर्धनाविषयी पारंपारिक ज्ञान प्रसारण करण्याच्या हेतूसाठी नाग हाताळण्यास केंद्रिय पर्यावरण, वन आणि जलवायु परिवर्तन मंत्रालयाने दिली आहे. २७ जुलै ते ३१ जुलै या कालावधीपुरती ही परलानगी असल्याचे वनविभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

शिराळ्यात नागपंचमी निमित्त जिवंत नागपूजा करण्याची प्रथा होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने यावर २००२ मध्ये निर्बंध आणल्यानंतर प्रतिकात्मक नागपूजा केली जात आहे. मात्र, यावर शिराळ्यातील २१ अर्जदारांनी केंद्रिय वन मंत्रालयाकडे वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ मधील नियम क्र. १२ अन्वये विशेष उद्देशामधील अभ्यास करण्यासाठी आणि शिक्षणासाठी नाग पकडण्यासाठी मंजूरीबाबत विहित नमुन्यात परवानगी मागणी केलेली होती. त्यानुसार केंद्रीय पर्यावरण, वन आणि जलवायु परिवर्तन मंत्रालय यांच्याकडून २१ अर्जदारांना अटी व शर्तीसह परवानगी देण्यात आली आहे.

नाग पकडण्यासाठी देण्यात आलेली परवानगी ही केवळ शैक्षणिक उद्देशासाठी व स्थानिक लोकांमध्ये, समाजामध्ये सर्प संवर्धनाविषयी पारंपारिक ज्ञान प्रसारणासाठी देण्यात आलेली आहे. हे करताना व्यावसायीक किंवा मनोरंजन, स्पर्धा, मिरवणूक, खेळ याला अटकाव करण्यात आलेला आहे. तसेच ज्या अर्जदारांना परवानगी मिळालेली आहे त्यांनी मुख्य वन्यजीव संरक्षक किंवा त्यांच्याकडून अधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांमार्फतच व वन व वन्यजीव अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हे नाग पकडण्याचे बंधन घालण्यात आले आहे.

यामध्ये एकाही नागाचा मृत्यू होणार नाही व नाग सुरक्षितपणे मूळ अधिवासात सोडण्याबाबत सूचना करण्यात आलेल्या आहेत. या २१ अर्जदारांव्यतिरिक्त कोणीही नाग पकडल्यास तसेच स्पर्धा, मिरवणूक, खेळ केल्याचे आढळून आल्यास त्यावर वन्यजीव अधिनियम, १९७२ नुसार गुन्हा नोंद करणेत येणार आहे.

केंद्रीय पर्यावरण, वन आणि जलवायु परिवर्तन मंत्रालय यांच्याकडून २१ अर्जदारांना अटी व शर्तीसह परवानगी

दरम्यान, जिवंत नागपूजा करण्यावरील न्यायालयाने निर्बंध शिथिल करण्याची आग्रही मागणी असली तरी याबाबत मात्र, कोणतीही मान्यता देण्यात आलेली नाही. शिराळ्यातील नागपंचमीवेळी जिवंत सर्पाची हाताळणी, प्रदर्शन, मिरवणूक काढली जाणार नाही यासाठी वन विभागानेही आपली यंत्रणा सज्ज ठेवली असून वनक्षेत्रपाल, वनरक्षक, वनपाल, वनकर्मचारी यांची मोठी फौज तैनात करण्यात आली आहे.

शहरात आणि परिसरात नागांची हाताळणी केली जाते का याची पाहणी करण्यासाठी वन विभागाने फिरती पथकेही तैनात केली आहेत. शहरात ‘सीसीटीव्ही’च्या माध्यमातून मिरवणुकीवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. तसेच ध्वनी मर्यादेचे उल्लंघन करण्यास सक्त मनाई असल्याचे निवेदन पोलीस अधिक्षक संदीप घुगे यांनी सोमवारी प्रसिध्द केले.

शिराळ्याची नागपंचमी शांततेत पार पडावी कायदेभंग होउ नये यासाठी सुमारे ७०० पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले असूेन पेठपासून शिराळ्याकडे जाण्यासाठी वाहतूक एकेरी करण्यात आली आहे. परतीच्या प्रवासासाठी शिराळा बायपासमार्गे कापरी, कार्वे, ऐतवडे बुद्रुक मार्गे राष्ट्रीय महामार्गावर येतील.

शिराळ्यातील केवळ २१ अर्जदारांनाच नाग पकडण्यास परवानगी देण्यात आली असून याव्यतिरिक्त कोणी नाग पकडला तर त्यांच्यावर वन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तसेच वन मंत्रालयाने घालून दिलेल्या अटींचे उल्लंघन केल्यास संबंधितावर कारवाई करण्यात येईल. – एकनाथ पारधी, वनक्षेत्रपाल शिराळा.