लोकसत्ता प्रतिनिधी

सोलापूर : भारताचा विकास ज्यांच्या नेतृत्वाखाली उंचावला आहे, त्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना देशातील सर्व गोरगरिबांचा आशीर्वाद लाभला आहे. या आशीर्वादामुळेच कोणी किती प्रयत्न केले तरी मोदींचा केस सुध्दा वाकडा होणार नाही. यंदाची लोकसभा निवडणूक नरेंद्र मोदी विरूद्ध राहुल गांधी यांच्यातच होणार असून यात पुन्हा सलग तिसऱ्या मोदी हेच पंतप्रधान बनतील, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

सोलापूर आणि माढा लोकसभेसाठी भाजपचे उमेदवारी अर्ज दाखल होताना फडणवीस हे पक्षाला बळ देण्यासाठी सोलापुरात आले होते. उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर चार हुतात्मा पुतळ्यांजवळ आयोजित जाहीर सभेत फडणवीस यांनी काँग्रेससह महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. भर दुपारच्या रणरणत्या उन्हात झालेल्या या सभेला हजारापेक्षा अधिक जनसमुदाय उपस्थित होता.

आणखी वाचा-तप्त उन्हात शक्तिप्रदर्शन करीत सोलापूर व माढ्यासाठी भाजपचे उमेदवारी अर्ज दाखल

फडणवीस यांनी मागील दहा वर्षात मोदी सरकारने राबविलेल्या विविध विकास योजनांचा उल्लेख करून त्या माध्यमातून देशातील सर्व घटकांचा विकास झाल्याचा दावा केला. ते म्हणाले, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडी तथा महायुती आहे. तर दुसरीकडे राहुल गांधी यांच्या इंडिया आघाडीचा पर्याय आहे. मोदी हे विकासाच्या गाडीचे शक्तिशाली इंजिन आहेत. त्याला राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे डबे लागले आहेत. शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट, रामदास आठवले यांचा रिपाइं असे विविध घटक पक्ष डब्यांच्या रूपाने आहेत. या गाडीत गोरगरीब, दीनदलित, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, तरूण, महिला, अल्पसंख्याक, ओबीसी अशा सर्वांना बसायला जागा आहे. परंतु दुसरीकडे राहुल गांधी यांच्या गाडीला डबेच नाही. त्यांच्या इंडिया आघाडीला प्रत्येक पक्षाला आपणच गाडीचे इंजिन असल्यासारखे वाटते. इंजिनमध्ये बसायला फक्त चालकासाठीच जागा असते, अशा शब्दांत फडणवीस यांनी विरोधकांना टोला लगावला.