महाराष्ट्रात आणि व्यापक पातळीवर देशातच काँग्रेसच्या भवितव्यावर भाजपाकडून आणि इतर विरोधी पक्षांकडून वारंवार मतं आणि भूमिका मांडल्या गेल्या आहेत. राजकीय वर्तुळात देखील काँग्रेस पक्षाच्या भविष्याविषयी चर्चा होत असताना महाराष्ट्रात काँग्रेसच्या भवितव्याविषयी काँग्रेस आमदार आणि राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी भूमिका मांडली आहे. “महाराष्ट्रात काँग्रेसचं कार्य ही महाराष्ट्र काँग्रेसची शिदोरी आहे. महाराष्ट्रात काँग्रेसला पुन्हा उभारी द्यायची असेल, तर तळागाळातल्या सामान्य माणसाची नाळ पुन्हा सक्षमपणे जोडावी लागेल”, असं ते म्हणाले आहेत. ‘लोकसत्ता’तर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘दृष्टी आणि कोन’ या दूरसंवादमालेत ते बोलत होते. यावेळी ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी काँग्रेस पक्षाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“…तर काँग्रेसला पुन्हा उभं करायला वेळ लागणार नाही!”

दरम्यान, यावेळी बोलताना अमित देशमुख यांनी काँग्रेसच्या मूलभूत विचारसरणीच्या आधारे आपल्या भूमिकेचं समर्थन केलं. “काँग्रेसची तत्व ही नेहमीच सर्वधर्म समभाव, सगळ्यांना सोबत घेऊन जाणं अशी सर्वसमावेशक राहिली आहेत. सध्या लहान-सहान मुद्द्यांवर समाजांमध्ये तेढ निर्माण होत आहे. पण काँग्रेसची संकल्पना महाराष्ट्रात रुजलेली आहे. हाच विचार या राज्याला तारू शकतो हा विश्वास जेव्हा आम्ही पुन्हा लोकांना नव्याने देऊ, तेव्हा काँग्रेसला पुन्हा उभं करण्याला फार काळ लागेल असं वाटत नाही”, असं त्यांनी यावेळी नमूद केलं.

जेव्हा राष्ट्रीय पातळीवर हे बदल होतील…!

महाराष्ट्रात काँग्रेसला उभारी मिळणं हे काहीसं देश पातळीवर होणाऱ्या बदलांवर देखील अवलंबून असल्याचं अमित देशमुख यांनी यावेळी नमूद केलं. “राज्याच्या राजकारणात जेव्हा काही मत व्यक्त केलं जातं, तेव्हा त्याला एक राष्ट्रीय अंग देखील असतं. देशात जेव्हा हे वातावरण बदलायला लागेल, तेव्हा त्याचाही फायदा महाराष्ट्र काँग्रेसला होईल. तेव्हा अगदी कमी कालावधीमध्ये राज्यात काँग्रेस आघाडी घेताना दिसेल”, असं ते म्हणाले.

राज्यातील महाविकासआघाडी हा नैसर्गिक पर्याय नव्हता, पण… : अमित देशमुख

“राज्यातील नेतृत्वाला अवधी द्यायला हवा”

अमित देशमुख यांनी काँग्रेसच्या भविष्याविषयी मत व्यक्त करतानाच राज्यातील सध्याच्या काँग्रेस नेतृत्वावर देखील विश्वास दाखवला आहे. “विधानसभा निवडणुकांच्या वेळी काँग्रेस पक्ष राज्यात दिसणार नाही, दोन आकड्यात सुद्धा जागा मिळणार नाही अशी भाकितं केली गेली. पण अडचणीच्या काळात इथल्या नेतृत्वाने हा पक्ष सावरला आणि तो उभा करण्याचा प्रयत्न केला. या पक्षाला सत्तेत आणण्यात अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांच्यासारख्या नेतृत्वाला यश मिळालं. याचं देखील कौतुक व्हायला हवं, त्याची दखल घेतली जायला हवी. या नेतृत्वाला थोडासा अवधी आपण द्यायला हवा. आम्ही सगळेच त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहोत”, असं ते म्हणाले.

काँग्रेसला अच्छे दिन येणार!

दरम्यान, यावेळी बोलताना अमित देशमुख यांनी काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रात अच्छे दिन येणार असल्याचं भाकित केलं आहे. “काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष, विचार आहे. चढ उतार प्रत्येक पक्षात होतात. काँग्रेसला आव्हानात्मक परिस्थितीतून मार्गक्रमण करावं लागत आहे. आम्ही खचलेलो नाहीत. आम्ही यातून मार्ग काढत आहोत. पक्ष संघटना, कार्यकर्ता मजबूत कसा होईल यासाठी काम करतोय. आता काँग्रेस क्रमांक तीनचा पक्ष वाटत असला, तसं दिसत असलं तरी हे सत्य नाही हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल”, असं अमित देशमुख यांनी सांगितलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta drushti ani kon congress minister amit deshmukh on party future in maharashtra pmw