अलिबाग – विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांची शिवसेना कोकणात मतदारांवर प्रभाव पाडण्यात सपशेल अपयशी ठरली. या पराभवानंतर आता पक्षाला मोठी गळती लागल्याचे दिसून येत आहे. जुने जाणते आणि जनाधार असलेले नेते पक्षाला सोडून जाण्याच्या तयारीत आहे. महत्वाची बाब म्हणजे पक्षपातळीवर ही गळती रोखण्यासाठी पावले उचलली जात नसल्याने, आगामी काळात पक्षाचे कोकणातील भवितव्य अडचणीत येण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. शिवसेनेचे सर्वाधिक आमदार कोकणातून निवडून येत असत. मात्र पक्षांतील बंडखोरीनंतर शिवसेनेची ताकद दोन गटांत विभागली गेली. प्रस्थापित नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत एकनाथ शिंदेंचा हात धरला. त्यामुळे कोकणातील उद्धव ठाकरेंच्या वर्चस्वाला धक्के बसण्यास सुरुवात झाली आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत याचाच प्रत्यय आला. या निवडणूकीत रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १५ मतदारसंघांमधून शिवसेना शिंदे गट ८, भाजप ४, राष्ट्रवादी काँग्रेस २, शिवसेना ठाकरे गटाचा १ आमदार निवडून आले. मतदारांवर प्रभाव पाडण्यात उद्धव ठाकरेंची शिवसेना सपशेल अपयशी ठरल्याचे दिसून आले. त्यामुळे उरले सुरले कार्यकर्तेही अस्वस्थ झाले आहेत. त्यामुळे पक्षातील नेत्यांनी नव्या पर्यांयांचा शोध सुरू केला आहे.

विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी कोकणात भाजपमधील असंतुष्ट नेत्यांना पक्षात घेऊन निवडणूक लढविण्याची संधी दिली. त्यामुळे पक्षातील निष्ठावान नेते नाराज झाले. त्याचा परिणाम निवडणुकीच्या निकालावर दिसून आला. रायगड जिल्ह्यात पक्ष नेतृत्वाने शेकापशी जुळवून घेण्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे पनवेल, उरणमध्ये महाविकास आघाडीतील मतविभाजन भाजपच्या पथ्यावर पडले. ठाकरेंची कर्जत मतदारसंघात उमेदवार निवड चुकली. या सर्व कारणामुळे निवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवारांचा पाडाव झाला. त्यामुळे नेते आणि कार्यकर्ते धास्तावले आहेत. सत्तेच्या जवळ जाण्यासाठी नव्या पर्यायांचा शोध घेऊ लागले आहेत.

शिवसेनेचे रत्नागिरी तालुकाप्रमुख बंड्या साळवी, माजी जिल्हा परिषद सदस्य महेंद्र झापडेकर यांनी नुकताच शिवसेना शिंदेगटात प्रवेश केला आहे. तर माजी आमदार राजन साळवी भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरु आहेत. अशातच आता महाड मतदारसंघातून निवडणूक लढविणाऱ्या स्नेहल जगताप यादेखील भाजपच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे. भाजपचे प्रविण दरेकर हे स्नेहल जगताप यांच्या संपर्कात आहेत. अलिबाग मतदारसंघातही शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर ठाकरे गटात अस्वस्थता वाढली असल्याचे दिसून येत आहे. सत्तेसोबत राहण्याचा आग्रह कार्यकर्त्यांचा आहे. त्यामुळे नेत्यांना याबाबत लवकरच ठोस निर्णय घ्यावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकणात ठाकरे गटाच्या अडचणीत आगामी काळात वाढू शकतात.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra assembly election defeat konkan uddhav thackeray group weak print politics news ssb