Vinod Ghosalkar Announce For Dahis Vidhansabha Constituency : विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाने आज दुपारी तिघांची नावे जाहीर केली होती. वर्सोवातून हरुन खान, घाटकोपर पश्चिम येथून संजय भालेराव, विलेपार्ले येथून संदिप नाईक या तिघांची उमेदवारी घोषित करण्यात आली होती. तसंच, घोसाळकर कुटुंबियांनाही एबी फॉर्म दिला होता. दहिसर विधानसभा मतदारसंघातून तेजस्वी घोसाळकर आणि विनोद घोसाळकर दोघेही इच्छूक होते. त्यामुळे कोणाला उमेदवारी मिळणार हे निश्चित झाले नव्हते. दरम्यान, सायंकाळी आठ वाजून पाच मिनिटांनी शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाच्या अधिकृत एक्स खात्यावरून तेजस्वी घोसाळकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. परंतु, लागलीच विनोद घोसाळकर यांचं नाव त्या ठिकाणी एडीट करण्यात आलं. त्यामुळे तासाभरात नेमकं काय घडलं हा प्रश्न उपस्थित केला जातोय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

८ फेब्रुवारी रोजी शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची फेसबूक लाईव्ह करून हत्या करण्यात आली होती. या हत्येत मॉरिस नोरान्हा उर्फ मॉरिसभाईने यांचं नाव समोर आलं होतं. जनतेत मिसळणारं जोडपं म्हणून घोसाळकर पती-पत्नीची ओळख होती. तर, अभिषेक घोसाळकर यांचे वडील विनोद घोसाळकर हे उद्धव ठाकरे यांचे कट्टर समर्थक आणि या मतदारसंघाचे माजी आमदार राहिले आहेत. त्यामुळे दहीसर विधानसभा मतदारसंघातून तेजस्वी घोसाळकर आणि विनोद घोसाळकर यांच्या नावाची चर्चा होती. हे दोघेही निवडणूक लढण्यास इच्छूक होते. परंतु, दोघांच्या नावापैकी एकाचं नाव निश्चित होत नव्हतं.

हेही वाचा >> “मी निवडणूक लढणारच…!”, नवाब मलिक ठाम; लेकीच्या शेजारच्या मतदारसंघातून रिंगणात

तेजस्वी घोसाळकरांच्या ऐवजी आता विनोद घोसाळकर (Vinod Ghosalkar)

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी घोसाळकर कुटुंबियांकडे एक एबी फॉर्म दिला आणि उमेदवार दोघांपैकी उमेदवार निवडीचं स्वातंत्र्य दिलं. त्यानुसार तेजस्वी घोसाळकर यांचं नाव निश्चित करण्यात आल्याचं पुढे आलं. त्यानुसार, शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाच्या अधिकृत एक्स खात्यावरून आठ वाजून पाच मिनिटांनी तेजस्वी घोसाळकर यांचं नाव जाहीर करण्यात आलं. परंतु, तासाभरातच म्हणजे आठ वाजून ५८ मिनिटांनी हे नाव बदलण्यात आलं आणि त्याजागी विनोद घोसाळकर यांचं नाव एडीट करण्यात आलं. त्यामुळे आत दहिसर विधानसभा मतदारसंघासाठी विनोद घोसाळकर यांच्या नावाची अधिकृत घोषणा झाली आहे. विनोद घोसाळकर हे २००९ साली या मतदारसंघाचे आमदार होते. त्यानंतर २०१४ पासून महायुतीच्या काळात भाजपाच्या मनीषा चौधरी या ठिकाणी निवडून आल्या. परंतु, सध्याची राजकीय समिकरणे वेगळी असल्याने विनोद घोसाळकर यांना पुन्हा एकदा संधी मिळाली आहे.

भाजपाच्या मनीषा चौधरी यांच्याविरोधात होणार निवडणूक

भाजपाने या मतदारसंघातून मनीषा चौधरी यांना उमेदवारी दिली आहे. यामुळे या मतदारसंघातील चूरस वाढली आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी आज वर्सोवातून हरुन खान, मलबार हिल येथून भैरुलाल चौधरी जैन आणि घाटकोपर पश्चिम मतदारसंघातून संजय भालेराव यांना एबी फॉर्म दिले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra assembly elections 2024 uddhav thackeray announced vinod ghosalkar from dahis instead of tejaswi ghosalkar sgk