Maharashtra Political Crisis Updates : राज्यातील नाट्यमय संत्तातरणानंतर यंदाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कमध्ये कोण घेणार यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे विरुद्ध मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असा वाद सुरु झाला आहे. दोन्ही नेत्यांच्या समर्थकांकडून पार्कात मेळावा आम्ही घेणार असा दावा केला जात आहे. असं असतानाच आता या वादामध्ये आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचलनालयाकडून अटक करण्यात आलेले शिवसेनेचे नेते आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी उडी घेतली आहे. न्यायालयामध्ये भेटलेल्या नेत्यांसोबत संजय राऊत यांनी चर्चा करताना दसरा मेळाव्यासंदर्भात भाष्य केलं आहे. या विषयाबद्दल बोलताना संजय राऊत यांनी, “शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होतो ही परंपरा आहे. परवानगी मिळाली नाही तरी शिवसैनिकांनी शिवाजी पार्कमध्ये मेळावा घ्यावा” असा सल्ला दिला आहे.
शिवसेना पक्षात उभी फूट पडल्यापासून दोन्ही गटातील नेते एकमेकावर कठोर शब्दांत टीका करताना दिसत आहेत. मागील काही दिवसांपासून उद्धव ठाकरे गटातील आमदार भास्कर जाधव आणि शिंदे गटातील नेते रामदास कदम यांच्यातील संघर्षही शिगेला पोहोचला आहे. काही दिवसांपूर्वी रामदास कदम यांचे भाषण ऐकल्यानंतर महिला त्यांची जोड्याने पूजा करतील. मुंबईतील शौचालयांत जेवढी घाण नाही, तेवढी घाण रामदास कदम यांच्या तोंडून बाहेर पडली, असे भास्कर जाधव म्हणाले होते. आता भास्कर जाधव यांच्या याच वक्तव्यावर रामदास कदम यांनी भाष्य केलं आहे. भास्कर जाधव यांना डॉक्टरांची नितांत गरज आहे. त्यांच्यावर वेळीच उपचार केले नाही, तर ते वेडे होऊन दगडही मारू शकतात, असा टोला रामदास कदम यांनी लगावला आहे. हा विषयही दिवसभर चर्चेत राहण्याची शक्यता आहे.
Maharashtra News Updates, 20 September 2022: राज्यातील सामाजिक, आर्थिक, राजकीय क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींची प्रत्येक अपडेट
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने(एमआयडीसी) केलेल्या भूखंड वाटपावरील स्थगिती उठवली आहे. उद्योग विभागाने केलेल्या छाननीअंती १८१ भूखंड वाटपावरील स्थगिती उठविण्यात आली. दरम्यान, १० प्रकल्पांची छाननी अद्यापही सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
शिवसेना पक्षातर्फे शिवजी पार्कवर दरवर्षी दसरा मेळाव्याचे आयोजन केले जाते. मात्र शिवसेना पक्षात उभी फूट पडल्यामुळे शिंदे गट आणि उद्धव ठाकरे समर्थक अशा दोन्ही बाजूने शिवाजी पार्कवरच मेळावा घेण्यासाठी रस्सीखेच सुरू आहे. शिवाजी पार्कवर सभा घेण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी दोन्ही गटाने महापालिकेकडे अर्ज केलेला आहे. असे असताना शिंदे गटातील नेते तथा पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी दसरा मेळाव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. मैदान तसेच कोणत्याही पार्कवर कोणाची मालकी नसते. ही सर्वजनिक मालमत्ता आहे. महापालिका ज्यांना परवानगी देईल, तोच गट शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेईल, असे गुलाबराव पाटील म्हणाले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्यामध्ये सत्तेत असणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार उर्वरित अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार नाही असं भाकित व्यक्त केलं आहे. इतकच नाही तर भाजपामुळेच हे सरकार कोसळेल असंही पाटील यांनी म्हटलं आहे. सांगलीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच शिंदे सरकारच्या कारभारावर नाराज असल्याचा दावा जयंत पाटील यांनी केला असून प्रशासनातील अधिकाऱ्यांनाही हे सरकार फार दिवस टिकणार नाही याचा अंदाज असल्याचं विधान त्यांनी केलंय.
