Maharashtra Latest Marathi News, 25 july 2022 : राज्यासह देशात मागील काही दिवसांपासून मोठ्या घडामोडी घडत आहेत. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत ६४ टक्के मतांसह विजय मिळवलेल्या द्रौपदी मुर्मू यांचा आज शपथविधी आहे. त्या आज देशाच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेतील. या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशातील दिग्गज व्यक्ती उपस्थित राहणार आहेत.

तर दुसरीकडे राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील संघर्षही तीव्र होत चालला असून दोन्ही बाजूंचे नेते एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप करताना दिसत आहेत. आजदेखील शिवसेनेतील अंतर्गत वादाच्या अनुषंगाने मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. काही दिवसांत मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्यामुळे भाजपा आणि शिंदे गट यांच्यातही खल होण्याची शक्यता आहे.

या घडामोडींसह राज्य तसेच देशातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर.

Live Updates

राज्य तसेच देशातील मुख्य घडामोडींसह सर्व अपडेट्स वाचा एका क्लिकवर.

12:12 (IST) 25 Jul 2022
अप्पर वर्धा धरण सप्तरंगाने उजळले; धरणातून कोसळणाऱ्या पाण्यात आकर्षक रोषणाई

पश्चिम विदर्भातील सर्वात मोठे अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरण सप्तरंगाने उजळले आहे. धरणातून कोसळणाऱ्या पाण्यात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. अकोल्यातील विदर्भ जलविद्युत व उपसा सिंचन विभागाने केलेल्या कामामुळे धरणातील पाणी सप्तरंगाने झळाळून निघाले. ही रोषणाई कायमस्वरूपी राहणार असल्याची माहिती विभागाचे कार्यकारी अभियंता अजित सोळंके यांनी दिली. वाचा सविस्तर बातमी…

12:01 (IST) 25 Jul 2022
“एका गरीब घरात जन्मलेली मुलगी…,” द्रौपदी मुर्मू यांनी देशाला केलं संबोधित, म्हणाल्या “हे भारतातील प्रत्येक गरिबाचं यश”

द्रौपदी मुर्मू यांनी आज राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली. संसदेतील सेंट्रल हॉलमध्ये पार पडलेल्या या शपथविधीला माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासहित सर्व मोठे नेते उपस्थित होते. द्रौपदी मुर्मू यांनी देशाच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा हे मुर्मू यांना राष्ट्रपतीपदाची शपथ दिली. यानंतर देशाला संबोधित करत द्रौपदी मुर्मू यांनी आपला जीवनप्रवास मांडला. तसंच करोना काळात केंद्र सरकारने केलेल्या कामाचं कौतुकही केलं.

सविस्तर बातमी

11:57 (IST) 25 Jul 2022
मुंबई : कतरिना कैफ, विकी कौशलला जीवे मारण्याची धमकी; सांताक्रूझ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

अभिनेत्री कतरिना कैफ आणि तिचा पती तसेच अभिनेता विकी कौशलला जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीय. या प्रकरणामध्ये मुंबईमधील सांताक्रूझ पोलीस स्थानकामध्ये अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून या दोघांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्यानंतर आम्ही सांताक्रूझ पोलीस स्थानकामध्ये गुन्ह्याची नोंद केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. येथे वाचा सविस्तर वृत्त

11:50 (IST) 25 Jul 2022
गोंदिया जिल्हाधिकाऱ्यांनी केली चार किलोमीटर चिखलातून पायपीट

गोंदिया जिल्ह्याच्या टोकावरील देवरी तालुक्यातील चुंभली हे ६५ घरे आणि ३५९ च्या वर लोकसंख्या असलेले छोटेसे गाव. देशात एकीकडे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे तर दुसरीकडे, चुंभली ग्रामस्थ अद्यापही पायाभूत सोयी-सुविधांपासून वंचित आहेत, किंबहुना त्यांना या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. अद्यापही या गावात मुख्य रस्ता नाही, नदीवर पूल नाही. याबाबतची माहिती मिळताच जिल्हाधिकारी नयना गुंडे, पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी चार किलोमीटर चिखलातून पायपीट करत या गावात हजेरी लावली व परिस्थितीचा आढावा घेतला. वाचा सविस्तर बातमी…

11:43 (IST) 25 Jul 2022
ठाकरे विरुद्ध शिंदे : निवडणूक आयोगाने शिवसेनेसंदर्भात दिलेल्या ‘त्या’ निर्देशांविरोधात उद्धव ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या बंडखोर गटाने शिवसेना पक्षावरील आपला दावा सादर करत थेट निवडणूक आयोगाकडे मागणी केली. यानंतर निवडणूक आयोगानेही कार्यवाही सुरू करत दोन्ही गटांना शिवसेनेवरील दाव्याबाबत कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश दिले. आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाने शिंदे गटाच्या याच मागणीविरोधात मोठं पाऊल उचललं आहे. ठाकरे गटाने शिंदे गटाच्या या मागणविरोधात थेट सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत.

सविस्तर बातमी…

11:24 (IST) 25 Jul 2022
अंबरनाथ : सिगारेट ओढण्यास मनाई केल्याने चाकूहल्ला; हॉटेलचीही नासधूस

हॉटेलमध्ये सिगारेट ओढणाऱ्याला रोखल्याने त्याने हॉटेलमधील वेटर आणि चालकावर चाकुहल्ला केल्याचा प्रकार अंबरनाथमध्ये घडला आहे. जयेश सोनावणे असे आरोपीचे नाव असून या प्रकारानंतर या आरोपीला हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनीही चोप दिल्याचे कळते आहे. याप्रकरणी अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात चाकू हल्ला करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाचा सविस्तर बातमी…

11:21 (IST) 25 Jul 2022
‘खंजीर खुपसला’ टीकेवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर; म्हणाले, “जे काँग्रेस, राष्ट्रवादीच्या बेड्यांमध्ये…”

राज्यामध्ये मागील महिन्याभरापासून सुरु असणाऱ्या सत्तासंघर्षामध्ये उद्धव ठाकरे गट विरुद्ध एकनाथ शिंदे गट असे आरोप प्रत्यारोप पहायला मिळत आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबरोबरच त्यांचे पुत्र आदित्य ठाकरेसुद्धा त्यांच्या शिवसंवाद यात्रेदरम्यान बंडखोर आमदारांनी पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप करताना दिसत आहेत. याच आरोपांवर आता बंडखोरांचे नेतृत्व करणारे नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खोचक शब्दांमध्ये उत्तर दिलं आहे. योग्य वेळी आपण खंजीर कोणी खुपसला याबद्दल बोलूच असं सांगताना त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला लगावला. येथे वाचा सविस्तर वृत्त

11:21 (IST) 25 Jul 2022
उद्धव ठाकरेंच्या ‘वडील चोरायला निघाले’ टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं उत्तर; म्हणाले, “त्यांच्या आशीर्वादामुळेच हे…”

निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष संघटनेतील बहुमत येत्या ८ ऑगस्टपर्यंत कागदोपत्री सिद्ध करा, असे निर्देश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहेत. यावरुन आता उद्धव ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतल्याचं पहायला मिळत आहे. प्रवक्ते संजय राऊत यांच्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर टीका करताना, ‘वडील आणि पक्ष चोरायला निघाले, तुम्ही मर्द नव्हे तर दरोडेखोर’ असा टोला लगावला आहे. माजी मुख्यमंत्र्यांच्या या टीकेला विद्यमान मुख्यमंत्र्यांनी काही तासांमध्येच उत्तर दिलं आहे. येथे वाचा सविस्तर वृत्त

11:20 (IST) 25 Jul 2022
Gold-Silver Price on 25 July 2022: सोन्याचे दर जैसे थे; चांदी किंचित घसरली; जाणून घ्या सोन्या-चांदीचे आजचे दर

उत्पादन शुल्क, राज्य कर आणि जडणघडणीसाठी आकरले जाणारे शुल्कामुळे (मेकिंग चार्जेसमुळे) सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात. जाणून घ्या आज राज्यातील वेगवेगळ्या शहरांमध्ये सोन्याचे दर नेमके किती आहेत. येथे वाचा सविस्तर वृत्त.

11:04 (IST) 25 Jul 2022
नशेसाठी झोपेच्या गोळ्यांची विक्री; अन्न आणि ओैषध विभागाची वाघोलीत कारवाई

झोपेसाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार (प्रिस्किप्शन) झोपेसाठी वापरण्यात येणाऱ्या औषधाच्या गोळ्यांचा वापर नशेसाठी करण्यात येत असल्याचे उघडकीस आले आहे. अन्न आणि ओैषध प्रशासनाने (एफडीए) वाघोलीत कारवाई करून एका ओैषध विक्री दुकानातून सहा हजार गोळ्या जप्त केल्या असून ओैषध विक्रेत्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाचा सविस्तर बातमी…

11:01 (IST) 25 Jul 2022
बाळासाहेबांचे विचार जो पुढे घेऊन जाणार त्यालाच जनता समर्थन देणार- संदीप देशपांडे

आता राजाचा मुलगा राजा होणार नाही. ज्याचा हक्क असेल तोच आता राजा होणार. बाळासाहेबांचे विचार जो पुढे घेऊन जाणार त्यांनाच जनता समर्थन देणार, असे मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले.

10:54 (IST) 25 Jul 2022
MPSC Updates : पुण्यात ‘एमपीएससी’च्या विद्यार्थ्यांचे आंदोलन स्थगित

महाराष्ट्र राज्य सेवेची सुधारित परीक्षा योजना आणि अभ्यासक्रमाची अंमलबजावणी २०२५ पासून करण्याच्या मागणीसाठी आज पुण्यातील अहिल्यादेवी शिक्षण मंडळ समोर स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी आंदोलन करणार होते. त्या पार्श्वभूमीवर पोलिसानी कडक बंदोबस्त ठेवला. पण त्यापूर्वीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत आंदोलन केल्यास कडक कारवाई केली जाईल, असा आदेश काढण्यात आला. त्यानंतर विद्यार्थिनी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला. वाचा सविस्तर बातमी…

10:32 (IST) 25 Jul 2022
ठाणे : मुंबई-नाशिक महामार्गावरील खड्ड्यांनी घेतला तरूणाचा जीव

मुंबई-नाशिक महामार्गावरील खड्ड्यांनी अखेर एका तरूणाचा जीव घेतला. रांजनोली पूलाजवळ खड्ड्यात दुचाकी गेल्याने तोल जाऊन रस्त्यावर पडलेल्या या तरूणाच्या अंगावरून डम्पर गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ब्रिजेशकुमार जैस्वार असे मृत तरूणाचे नाव आहे. या प्रकरणी डम्पर चालकाविरोधात कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाचा सविस्तर बातमी…

10:03 (IST) 25 Jul 2022
नागपूर : अधिकाऱ्याला शिवीगाळ करताना आमदार वंजारींची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल

काँग्रेसचे आमदार अभिजीत वंजारी हे निधी वाटपाच्या मुद्यावरून नागपूर महापालिकेच्या एका अधिकाऱ्याला शिवीगाळ करीत असल्याची ध्वनिफीत (ऑडिओ क्लिप) समाज माध्यमांमध्ये प्रसारित करण्यात आली. मात्र, वंजारी यांनी या ध्वनिफीतमधील आवाज आपला नसल्याचे म्हटले आहे. वाचा सविस्तर बातमी…

09:59 (IST) 25 Jul 2022
उद्धव ठाकरेंच्या आव्हानाला अब्दुल सत्तारांचे जशास तसे उत्तर

बंडखोर गटातील सिल्लोड मतदारसंघाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी ठाकरेंच्या आव्हानाला उत्तर दिले आहे. एकनाथ शिंदे यांनी मला परवानगी दिली तर मी उद्या राजीमाना देणार आणि पहिल्या निवडणुकीत मी किती मतांनी निवडून येणार, हे त्यांना (उद्धव ठाकरे) दाखवून देणार, असं प्रत्युत्तर सत्तार यांनी दिले आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. वाचा सविस्तर

09:58 (IST) 25 Jul 2022
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीहून कोल्हापूरला जाणार

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या आईंचे निधन झाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज नवी दिल्लीहून कोल्हापूरला जात आहेत. आज दुपारी २ वाजता मुख्यमंत्री विमानाने कोल्हापूरकडे प्रयाण करतील. सायंकाळी ४ वाजता त्यांचे कोल्हापूर विमानतळावर आगमन होईल. तिथून ते छत्रपती संभाजी पार्क येथे पाटील यांच्या निवासस्थानी पोहोचतील. सायंकाळी ५.१५ वाजता मुख्यमंत्री विमानाने मुंबईकडे रवाना होतील.

breaking news live update