CM Eknath Shinde Rebellion: महाराष्ट्रासाठी आज मोठा दिवस आहे. कारण महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल सर्वोच्च न्यायालयात लागणार आहे. या निकालानंतर एकनाथ शिंदे सरकार राहणार की जाणार? याविषयी उलटसुलट चर्चा रंगल्या आहे. एकनाथ शिंदेंसह १६ आमदार अपात्र ठरतील असा विश्वास नरहरी झिरवळ यांनी व्यक्त केला आहे. तसंच संजय राऊत यांनीही असंच वक्तव्य केलं आहे. त्यामुळे या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड, जस्टिस एम आर शाह, जस्टिस कृष्ण मुरारी, जस्टिस हिमा कोहली आणि जस्टिस पी. एस. नरसिंह यांचं घटनापीठ देणार आहे. हा निकाल देशाच्या दृष्टीनेही महत्त्वाचा मानला जातो आहे. आजच्या निकालातून राज्यपाल, विधानसभा अध्यक्षांचे अधिकार, विधानसभेच्या अध्यक्षांवर अविश्वास ठराव असताना त्यांचे अधिकार आदी गोष्टींवर फैसला होणार आहे. या शिवाय पक्षांतर बंदी कायद्याच्या संदर्भानंही आजच्या निकालात भाष्य होणार आहे.
बंडाचा घटनाक्रम काय होता?
२१ जून २०२२ ही तारीख होती ज्यादिवशी एकनाथ शिंदे हे शिवसेनेतल्या काही आमदारांसह नॉट रिचेबल झाले. त्यांच्यासह सुरुवातीला १६ आमदार होते. या घटनेने महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ माजली होती. विधीमंडळ पक्षनेत्याच्या बैठकीला हे आमदार उपस्थित नव्हते. त्यानंतर शिवसेनेतले आणखी २४ आमदार पुढच्या तीन दिवसात एकनाथ शिंदे यांच्यासह गेले. त्यावेळी मुख्यमंत्री पदावर असलेल्या उद्धव ठाकरेंनी मुख्य प्रतोद नियुक्त केला आणि त्यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष असलेल्या नरहरी झिरवळ यांच्या द्वारे बंडखोर आमदारांना नोटीस पाठवली आणि त्यांच्याविरोधात अपात्रतेची कारवाई सुरु केली.
अपात्रतेची टांगती तलवार
दुसरीकडे बंडखोर आमदारही शांत बसले नाहीत. उपाध्यक्ष असलेल्या नरहरी झिरवळ यांच्याविरोधात अविश्वासाची नोटीस बजावली आणि योग्य कार्यवाहीनुसार नोटीस आली नसल्याचं सांगत ती फेटाळली होती. उपाध्यक्ष असलेल्या झिरवळ यांनी आमदारांच्या अपात्रतेची कारवाई सुरु केली. त्यामुळे बंडखोर आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. आमदारांनी या नोटीसला उत्तर देण्यासाठी वेळ मागितला. त्याच दरम्यान शिंदे गटाच्या आमदारांनी महाराष्ट्र सोडला. जिवाला आणि संपत्तीला धोका असल्याचं कारण या सगळ्यांनी दिलं आणि राज्यपालांशी संपर्क साधला.
२९ जून २०२२२ ला उद्धव ठाकरेंचा राजीनामा
या घटना घडल्यानंतर त्यावेळी विरोधी पक्षनेते असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी सरकारकडे बहुमत नसल्याचं सांगून बहुमत चाचणी घेण्याची विनंती राज्यपालांना केली. राज्यपाल पदावर असलेल्या भगतसिंह कोश्यारींनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले. मात्र उद्धव ठाकरे यांनी बहुमत सादर करण्यापूर्वीच म्हणजेच २९ जूनला राजीनामा दिला. ३० जून २०२२ ला मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंनी तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. या घटनाक्रमानंतर ठाकरे गटाने राज्यपालांच्या कार्यवाहीवर प्रश्न उपस्थित करून कोर्टात धाव घेतली. या सगळ्यावर नऊ महिने दोन्ही बाजूने युक्तिवाद चालला. आता या प्रकरणी काय होणार ते पाहणं हे अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे.
१६ आमदारांच्या यादीत कुणाची नावं?
१) एकनाथ शिंदे
२) अब्दुल सत्तार<br>३) संदीपान भुमरे
४) संजय शिरसाट
५) तानाजी सावंत
६) यामिनी जाधव
७) चिमणराव पाटील
८) भरत गोगावले
९) लता सोनावणे
१०) प्रकाश सुर्वे
११) बालाजी किणीकर
१२) अनिल बाबर
१३) महेश शिंदे
१४) संजय रायमुलकर
१५) रमेश बोरणारे
१६) बालाजी कल्याणकर