अलिबाग- कनकेश्वर मंदीरात दर्शनासाठी जाणाऱ्या महिलेचा पाठलाग करून तिचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला अलिबाग न्यायालयाने अवघ्या ४८ तासात शिक्षा सुनावली. हरेश महादेव पाटील असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. महत्वाची बाब म्हणजे मांडवा सागरी पोलीसांनी या प्रकरणात २४ तासात तपासपूर्ण करून न्यायालयात आरोपी विरोधात दोषारोपत्र दाखल केले. पोलीसांची तपासातील तत्परता फळाला आली आहे. अलिबाग न्यायालयाने त्याच तत्परतेनी प्रकरणाची सुनावणी घेऊन आरोपीला सात दिवसांची कैद आणि ५०० रुपयांचा दंडही ठोठावला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गोंधळपाडा येथे राहणारी ४० वर्षिय महिला ही देवदर्शनासाठी कनकेश्वर येथे जात होती. मंदीराच्या पायऱ्या चढत असतांना आरोपी हरेश पाटील तेथे आला. महिलेचा पाठलागकरून छेड काढू लागला. अश्लिल संभाषण आणि अंगविक्षेपकरून तिचा विनयभंग केला. याप्रकरणी सदर महिलेने मांडवा सागरी पोलीस ठाण्यात या प्रकरणाची फिर्याद दाखल केली. पोलीसांनी फिर्यादीची तात्काळ दखल घेत आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला. पोलीस हवालदार एस एच म्हात्रे यांची तपासिक अमंलदार म्हणून नेमणूक करण्यात आली. त्यांनी या प्रकरणाचा २४ तासात तपासपूर्ण केला, आणि आरोपी हरेश पाटील याच्याविरोधात अलिबाग येथील प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी ईशा व्ही घाटगे यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. विशेष सरकारी वकील म्हणून अँड शितल पवार यांनी या प्रकरणी युक्तीवाद केला. महिला पोलीस हवालदार ए. व्ही मगर यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम केले. न्यायालयाने पोलीसांची तत्परता लक्षात घेऊन या प्रकरणाची तात्काळ सुनावणी घेतली. दोन्ही बाजूचे युक्तीवाद आणि साक्षी पुरावे  लक्षात घेऊन न्यायालयाने आरोपी हरेश पाटील याला विनयंभग प्रकरणी सात दिवसांची साधी कैद आणि ५०० रुपयांचा दंड ठोठावला.

   ११ मार्च २०२५ रोजी या प्रकरणी गुन्हा दाखल झाला. १२ मार्च २०२५ रोजी पोलीसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. १३ मार्च रोजी या प्रकरणाची सुनावणी होऊन न्यायालयाने आरोपीला शिक्षा सुनावली. म्हणजेच गुन्हा दाखल झाल्यापासून ४८ तासात आरोपीला शिक्षा सुनावण्यात आली आहे. राज्यात महिलांवरील अत्याचारांचे प्रमाण वाढत चालले आहे. या प्रकरणांचा संवेदनशीलपणे आणि गतीमानपणे तपास करण्याचे निर्देश पोलीसांना देण्यात आले आहे. त्याची उचीत अमंलबजावणी झाली तर आरोपींनी ४८ तासात शिक्षा होऊ शकते हे रायगड पोलीस आणि अलिबाग न्यायालयाने दाखवून दिले आहे.

महिलावरील अत्याचाराच्या गुन्ह्यांचा जलदगतीने तपास करून लवकरात लवकर आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्याचे निर्देश सर्व पोलीस ठाण्यांना देण्यात आले आहेत. त्याचे सकारात्मक परिणाम आता दिसून येत आहे.- सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mandwa maritime police sentenced accused of molesting woman alibaug crime news amy