Manoj Jarange Patil Dussehra Rally: बीडमधील नारायणगडावर आज मनोज जरांगे पाटील यांच्या दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासह शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर भाष्य केले आहे. यावेळी त्यांनी सरकारकडे शेतकऱ्यांसाठी विविध मागण्या करत शेतीला नोकरीचा दर्जा देण्याची आणि शेतकऱ्यांना पगार देण्याची मागणी केली आहे.

नारायणगडावरील भाषणात बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी मागणी केली की, “शेतीला नोकरीचा दर्जा देण्यात यावा. जे १० एकरच्या आतील शेती करतात, त्यांना महिन्याला १० हजार रुपये पगार सुरू करा. जर हा पगार दिला, तर बेरोजगार मुले शेतात तरी कामे करतील. मुलांना शेतीची कामे करायची सवय लागेल. पगारामुळे ते शेतात काम करू लागतील.”

यावेळी जरांगे पाटील यांनी, “कोणाला शेतीची १० हजार रुपयांची नोकरी पाहिजे?” असा प्रश्न विचारताच, उपस्थितांपैकी अनेकांनी हात उंचावून प्रतिसाद दिला. शेतकऱ्यांसाठी या विविध मागण्या करताना, मनोज जरांगे पाटील यांनी शेतकऱ्यांनी शेती विकू नये, असे आवाहनही केले.

दरम्यान गेल्या महिन्यात मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसह विविध मागण्या केल्या होत्या. त्यावेळी सरकारने जरागे पाटील यांच्या काही मागण्या मान्य करत काही मागण्या पूर्ण करण्यासाठी मुदत मागितली होती. त्या मागण्यांचा जरांगे पाटील यांनी आज पुन्हा उल्लेख केला.

जरांगे पाटील म्हणाले की, “जर सरकारने दिवाळीपर्यंत मराठवाड्यातील मराठ्यांना आरक्षण आणि शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण केले नाही तर जिल्हा परिषद निवडणुकीत सरकारची एकही जागा शेतकऱ्यांनी निवडून द्यायची नाही. तसेच या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत मतदान प्रक्रिया होऊ देणार नाही.”

(सविस्तर वृत्त लवकरच…)