छत्रपती संभाजीराजे यांचे अद्याप तळ्यात-मळय़ात सुरू असल्याने शिवसेनेने राज्यसभेच्या दुसऱ्या जागेकरिता कोल्हापूर जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या उमेदवारीचा विचार सुरू केला. ‘राजांइतकेच मावळेही महत्त्वाचे असतात’ अशा शब्दांत खासदार संजय राऊत पवार यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होण्याचे संकेत दिले आहेत. असं असतानाच आता शिवसेनेकडून छत्रपती संभाजीराजेंच्या अपक्ष उमेदवारीला विरोध केला जात असल्याचा दावा करत मराठा क्रांती मोर्चाने शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर कठोर शब्दांमध्ये टीका केलीय. संजय राऊत यांचा सत्तेचा माज महाराष्ट्रातील शिवप्रेमी जनता उतरवेल, असा इशारा मराठी क्रांती मोर्चाने दिलाय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेमका गोंधळ काय?
राज्यसभेच्या दुसऱ्या जागेकरिता शिवसेनेने कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांना उमेदवारी देण्याची तयारी दर्शविली आहे. फक्त त्यांनी शिवसेनेत प्रवेश करावा व पक्षाचे अधिकृत उमदेवार म्हणून रिंगणात उतरावे ही अट संभाजीराजे यांना घालण्यात आली आहे. अपक्ष म्हणून महाविकास आघाडीने पाठिंबा द्यावा, अशी संभाजीराजे यांची भूमिका आहे. या साऱ्या घडामोडी घडत असतानाच शिवसेनेने संभाजीराजे यांना सूचक इशारा दिला. कोल्हापूर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांना राज्यसभेची दुसरी उमेदवारी देण्याची तयारी शिवसेनेने सुरू केली. संभाजीराजे हे कोल्हापूरचे आहेत. यामुळेच कोल्हापूरच्या दुसऱ्या नेत्याला उमेदवारी देण्याची रणनीती शिवसेनेने आखली.

संजय पवार मुंबईत दाखल
मंगळवारी सकाळी कोल्हापूरचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांना तातडीने मुंबईत येण्याचा व राज्यसभेच्या दुसऱ्या जागेसाठी पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आवश्यक तयारी करण्याचा आदेश देण्यात आला. त्यानंतर संजय पवार मुंबईत दाखल झाले व शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांच्यासोबत त्यांनी कागदपत्रांची तयारी सुरू केली.

राऊत काय म्हणाले?
या सर्व घडामोडींबाबत माध्यमांनी शिवसेनेचे खासदार व मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांना शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवाराबाबत विचारले असता, संजय पवार हे दुसऱ्या जागेसाठी उमेदवारी अर्ज भरत आहेत. मात्र, उमेदवारीबाबत अधिकृत घोषणा मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे करतील, असे राऊत यांनी सांगितले. छत्रपती संभाजीराजे यांचा आम्ही सन्मान करतो. पण राजांइतकेच मावळेही महत्त्वाचे असतात, असा टोलाही राऊत यांनी लगावला.

मराठा क्रांती मोर्चाकडून संजय राऊतांना इशारा
दरम्यान, मराठा क्रांती मोर्चेचे समन्वयक अंकुश कदम यांनी प्रसारमाध्यमांसाठी जारी केलेल्या व्हिडीओमधून संजय राऊत यांना इशारा दिलाय. “छत्रपतींच्या अपक्ष उमेदवारीला संजय राऊत सातत्याने विरोध करताना दिसत आहेत. एकीकडे प्रियंका चतुर्वेदी, उर्मिला मातोंडकर यांना कुठल्याही प्रकारच्या अटी शर्थी न घालता राज्यसभेवर पाठवण्याची तयारी दाखवता आणि ज्या छत्रपतींच्या नावावरती एवढं वर्ष राजकारण करत आहेत, सत्ता भोगत आहेत (त्यांनाच विरोध करता.) या शिवसेनेचा ‘शिव’च आमच्या छत्रपतींचा आहे, असं असताना देखील संजय राऊत हे सातत्याने विरोध करताना दिसत आहेत,” असं म्हणत मराठा क्रांती मोर्चाने शिवसेनेविरोधात नाराजी व्यक्त केलीय.

पुढे बोलताना अंकुश कदम यांनी थेट शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार असणाऱ्या संजय राऊतांना इशारा दिलाय. “संजय राऊत तुमचा हा सत्तेचा माज महाराष्ट्रातील शिवप्रेमी जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही. २०२४ ला तुम्हाला याची राजकीय किंमत मोजावी लागेलच पण छत्रपती संभाजीराजे अपक्षच निवडणूक लढवणार,” असं कदम म्हणालेत.

संजय पवार काय म्हणाले?
मुंबईत आलेल्या संजय पवार यांना तुम्ही मूळ उमेदवार असणार की तुमचा अर्ज डमी उमेदवार म्हणून भरण्यात येत आहे, असे विचारले असता, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आमचे नेते आहेत. ते म्हणतील तसे होईल, असे उत्तर संजय पवार यांनी दिले. 

दोन दिवसांमध्ये अंतिम निर्णय होणार
संभाजीराजे हे अद्यापही शिवसेनेत प्रवेश करण्यास अनुकूल नाहीत. येत्या दोन दिवसांत संभाजीराजे यांच्याबद्दल अंतिम निर्णय घेतला जाईल, असे शिवसेनेच्या गोटातून सांगण्यात आले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maratha karanti morcha slams shivsena sanjay raut for opposing chhatrapati sambhaji raje in rajya sabha election scsg
First published on: 25-05-2022 at 09:47 IST