मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पुणे दौऱ्याची सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे. राज ठाकरे पुण्यात सभा घेणार होते. मात्र, ऐनवेळी ही सभा पुढे ढकलण्यात आल्यामुळे तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. यासंदर्भात मनसेकडून पावसाच्या शक्यतेमुळे डेक्कन नदीपात्रातील जागा मिळाली नसल्याचं कारण देत इतर ठिकाणांबाबत राज ठाकरे स्वत: घोषणा करतील, असं सांगण्यात आलं आहे. मात्र, यावरून शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी राज ठाकरेंवर खोचक शब्दांत टीका केल्यानंतर त्यावरून आता मनसेनं दिपाली सय्यद यांना खुलं आव्हान दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हणाल्या होत्या दिपाली सय्यद?

दिपाली सय्यद यांनी बुधवारी एक व्हिडीओ संदेश जारी केला होता. यामध्ये उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना दिलेल्या मुन्नाभाई या उपमेचा उल्लेख करत निशाणा साधला आहे. “पावसाचं कारण सांगून मैदान सोडले..भोंग्याचे कारण सांगून देशपांडे पळाले.. आयोध्येचे कंत्राट अर्धेच मिळाले..महाराष्ट्राला मुन्नाभाईच्या नावाने मामू मिळाले”, असं दिपाली सय्यद या व्हिडीओमध्ये म्हणताना दिसत आहेत.

यासंदर्भात आता मनसेनं दिपाली सय्यद यांना प्रत्युत्तर देत खुलं आव्हानच दिलं आहे. मनसे नेते अखिल चित्रे यांनी दीपाली सय्यद यांच्या टोल्याला प्रत्युत्तर देताना त्यांनी बदललेल्या नावांवरून निशाणा साधला आहे. “अवसरवादी ताई, तुम्हाला धड तुमचं नाव माहिती नाही. प्रत्येक वेळी राजकारणासाठी नाव बदलणाऱ्या तुम्ही. २०१४ साली अहमदनगरमधून निवडणूक लढवली, तर नाव दिपाली सय्यद. २०१९ला शिवसेनेकडून मुंब्रा-कळव्यातून निवडणूक लढवली, तर नाव सोफिया जहांगीर सय्यद. शिवसेनेत आणि शिवसंग्राममध्ये असताना प्रचारासाठी नाव दिपाली भोसले सय्यद. वारंवार राजकारणासाठी स्वत:चं नाव बदलणाऱ्या तुम्ही. तुम्हाला अवसरवादी नेत्या म्हणावं लागेल. तुम्ही इतरांना नावं ठेवता?”, असं अखिल चित्रे यांनी जारी केलेल्या व्हिडीओ संदेशात म्हटलं आहे.

“…महाराष्ट्राला मुन्नाभाईच्या नावाने मामू मिळाले”, दिपाली सय्यद यांचा मनसेला खोचक टोला!

“आम्ही वाईड बॉल म्हणून तुम्हाला उत्तर देत नव्हतो”

दरम्यान, अखिल चित्रे यांनी दिपाली सय्यद यांना वाईड बॉलची उपमा दिली आहे. “तुम्हाला काय उत्तर द्यायचं? म्हणून आम्ही तुम्हाला इतके दिवस वाईड बॉल म्हणून उत्तर देत नव्हतो. इतके तर सरडाही रंग बदलत नाही, जितकी तुम्ही नावं बदलता. आप ते शिवसंग्राम ते शिवसेना हा तुमचा विचार बदलत आणि नाव बदलत झालेला प्रवास आहे. तुमच्यात हिंमत असेल, तर आधी नाव बदलण्यामागचं रहस्य जनतेला आधी सांगा. नंतर हिंदुत्वाच्या, शिवसेनेच्या, बाळासाहेबांच्या विचारांच्या गप्पा मारा. आम्ही अपेक्षा करतो की तुम्ही उत्तर द्याल”, अशा शब्दांत अखिल चित्रेंनी दिपाली सय्यद यांना आव्हान दिलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns akhil chitre challenges shivsena leader marathi actress dipali sayed pmw
First published on: 19-05-2022 at 09:29 IST