MNS chief raj Thackeray morcha date changed : इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला राज्यतील राजकीय क्षेत्रातून विरोध केला जात आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत मुंबईतील गिरगाव चौपाटी येथे मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा केली. मात्र यावेळी त्यांनी सांगितलेल्या तारखेत बदल करण्यात आला आहे. राज ठाकरे यांनी ६ जुलै (रविवार) या दिवशी सकाळी हा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे म्हटले होते. मात्र आता ही तारीख बदलून ५ जुलै (शनिवार) करण्यात आली आहे. राज ठाकरेंनी सोशल मीडियावर पोस्ट करत याबद्दल माहिती दिली आहे.
“आज सकाळी आपल्या मराठीसाठी, महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी येत्या ६ जुलैला मोर्च्याची घोषणा केली होती. त्यात थोडा बदल आहे, हा मोर्चा रविवार ६ जुलैच्या ऐवजी, ५ जुलै शनिवारी सकाळी १० वाजता असणार आहे. बाकी ठिकाण आणि इतर सर्व तपशील तसेच असणार आहेत,” असे राज ठाकरे म्हणाले आहेत.
सस्नेह जय महाराष्ट्र,
आज सकाळी आपल्या मराठीसाठी, महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी येत्या ६ जुलैला मोर्च्याची घोषणा केली होती. त्यात थोडा बदल आहे, हा मोर्चा रविवार ६ जुलैच्या ऐवजी, ५ जुलै शनिवारी सकाळी १० वाजता असणार आहे. बाकी ठिकाण आणि इतर सर्व तपशील तसेच असणार आहेत. त्यामुळे… pic.twitter.com/BUN1Av0GSK— Raj Thackeray (@RajThackeray) June 26, 2025
राज ठाकरे काय म्हणाले होते?
राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सरकारची भूमिका मांडण्यासाठी आज राज ठाकरे यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी आपल्याला सरकारची भूमिका मान्य नसल्याचे म्हटले होते. यावेळी ते म्हणाले होते की, “पहिलीपासून हिंदीसक्ती होऊ देणार नाही, त्याविरोधात येत्या ६ जुलैला गिरगाव चौपाटीवरून मोर्चा काढण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. त्या मोर्चात कोणताही झेंडा नसेल. तो संपूर्ण मोर्चा हा मराठी माणसाचा असेल. मराठी हाच अजेंडा असेल. त्या मोर्चाचं नेतृत्व मराठी माणूस करेल…”
“महाराष्ट्राची संपूर्ण ताकद ६ जुलै रोजी सकाळी १० वाजता गिरगाव चौपाटीवर दिसेल. अशावेळी मला हेही बघायचं आहे, या मोर्चात कोण सामील होतंय आणि कोण येणार नाहीत, हे देखील मला बघायचं आहे.शिक्षणतज्ज्ञ, भाषातज्ज्ञांशी आम्ही बोलणार आहोत. सर्व विद्यार्थी, पालकांना आम्ही मोर्चाला आमंत्रण देणार आहोत. सरकारला एकदा कळू दे, महाराष्ट्राच्या मनात काय आहेत ते… हिंदीविरोधी मोर्चात सर्वजण सहभागी होतील. आम्ही महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांशी बोलणार आहोत. कोणताही वाद आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे, हे तुम्हाला ६ जुलैला कळेल…”