Raj Thackeray on Photo : आपल्या खुमासदार शैलीत टीका करणारे राज ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावर पुन्हा एकदा खरपूस टीका केली आहे. ही टीका भाजपाच्या कोणत्याही धोरणावर वा योजनेवर नसून नुकत्याच व्हायरल झालेल्या एका फोटोवर आहे. तो फोटो विलक्षण असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
निवडणुकीच्या काळात स्नेहभोजन साततत्याने होतात, असा मिश्किल प्रश्न मुलाखतकाराने राज ठाकरे यांना विचारला. गेल्या काही दिवसांत राज ठाकरे यांच्या विविध पक्षातील नेत्यांशी गाठीभेटी वाढल्याने हा प्रश्न विचारण्यात आला. काही दिवसांपूर्वी उदय सामंत यांच्याबरोबरही त्यांची भेट झाली. या प्रश्नावर उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले, कोर्टाने सांगायच्या आधीच ते माझ्या घरी येऊन गेलेत. राजकारणात तुमचे मतभेद असतात, वैर कधीच नसतं. हे एक हेल्थी राजकारण आपण म्हणतो तो एक काळ होता. तुमचा विरोध भूमिकांना आहे. भूमिकांना विरोध असणं स्वाभाविक आहे. तुम्ही विविध विचारांचे पक्ष असता, त्यामुळे भूमिकांना विरोध करत असता. वैयक्तिक गोष्टींवर हल्ली फार यायला लागलं आहे. याची आवश्यकता नाही. मतभेद असावेत, वैर नसावेत हे मी म्हटलं तरी त्या मतभेदात मैत्रीही नसावी. म्हणजे ज्या पद्धतीने भुजबळ आत शिरले आहेत.”
“परवा मी एक फोटो पाहिला. विलक्षण फोटो होता. देवेंद्र फडणवीस मध्ये बसले आहेत. उजव्या बाजूला अजित पवार, सुनील तटकरे आहेत. दुसऱ्या बाजूला अशोक चव्हाण, छगन भुजबळ, नारायण राणे वगैरे आहेत. बरेचजण आहेत. हा फोटो पाहतो तेव्हा मला पहिला प्रश्न पडतो ही भारतीय जनता पक्षाचा मतदार आणि कार्यकर्ते हा फोटो कसा बघत असतील? यांची लावली आपण, आणि सत्तेवर आले आणि आता हे लावायला आले”, असं ते मिश्किलीत म्हणाले.
दरम्यान, गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव २०२५ या कार्यक्रमातील हा फोटो आहे.