MNS Raj Thackeray in Mira Bhayandar महाराष्ट्रात सुरू असलेल्या मराठी भाषेच्या वादावरून राज्याचे राजकारण तापले आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात हिंदी भाषा, मराठी भाषा आणि अमराठी अशा मुद्यांवरून वाद सुरु आहे. काही दिवसांपूर्वी ठाणे जिल्ह्यातील मिरा भाईंदरमध्ये एका व्यापाऱ्याला मराठी भाषेवरून मारहाण करण्यात आल्यानंतर व्यापाऱ्यांनी एक मोर्चा काढला होता. या मोर्चाला प्रत्युत्तर देण्यासाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी अमराठी व्यापाऱ्यांच्या विरोधात मोर्चा काढला होता. त्यानंतर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा मिरा भाईंदरमध्ये पार पडली आहे. या जाहीर सभेत त्यांनी हिंदीसक्तीविरोधात संताप व्यक्त केला आहे.

“अख्खा पट्टा गुजरातला जोडण्याचे खटाटोप”

मिरा भाईंदरमधील सभेत हिंदीसक्तीविरोधात बोलतान राज ठाकरे म्हणाले, “हे सगळं षडयंत्र समजून घेतलं पाहिजे. त्यांना मीरा-भाईंदर ते पालघरपर्यंतचे मतदारसंघ अमराठी करायचे आहेत. हे मतदारसंघ तयार करून तुम्हाला लांब पाठवणार. हा अख्खाच्या अख्खा पट्टा गुजरातला जोडण्याचे खटाटोप सुरू आहे. हे आजचं नाहीये, हे पूर्वी त्यांनी जाहीररीत्या सांगितलं होतं,” असे राज ठाकरे म्हणाले.

देवेंद्र फडणवीसांवर टीका

राज ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना म्हणाले, “हिंदी भाषा पहिलीपासून शिकली पाहिजे म्हणे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की तिसरी भाषा हिंदी करणार म्हणजे करणार. मोर्च्याच्या धसक्याने निर्णय मागे घ्यायला लागणार होता. तुम्हाला आत्महत्या करायची असेल तर करा. महाराष्ट्रात पहिली ते पाचवी हिंदी आणण्याचा प्रयत्न तर करून पाहा. दुकानं नाही, शाळाच बंद करेन. महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी भांडतोय?,” असेही त्यांनी म्हटले.

“अमराठी लोकांनी लवकरात लवकर मराठी शिकावी”

अमराठी लोकांवर टीका करताना राज ठाकरे म्हणाले, “मराठी माणूस, मराठी भाषा याबाबतीत राज ठाकरे कोणाशीही तडजोड करणार नाही. तुम्हीही तसंच जगलं, वावरलं पाहिजे. जे कोणी अमराठी लोक राहत असतील त्यांनी लवकरात लवकर मराठी शिकावं. तुम्हा सर्वांना सांगणं आहे, ट्रेन-बस- टॅक्सी कायमस्वरुपी तुम्ही समोरच्याशी मराठीतच बोला. त्याला मराठीत बोलायला भाग पाडा,” असे ते म्हणाले.