गेल्या बारा दिवसांपासून तळेगावमध्ये जनरल मोटर चे कामगार उपोषण करत आहेत आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे विविध मतदार संघाचे दौरे करत आहेत. या सत्ताधाऱ्यांना फक्त निवडणुका दिसत आहेत. त्यांना केवळ मते पाहिजेत, त्यांना जनता दिसत नाही. हे देशाचे दुर्दैव आहे. मुर्दाड भावना घेऊन ते जर मतदार संघात फिरत असतील तर जनतेने देखील ठरवले आहे, असं म्हणत शरद पवार गटाचे नेते खासदार अमोल कोल्हे यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका केली आहे. ते तळेगावमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
अमोल कोल्हे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर कडाडून टीका केली आहे. चंद्रशेखर बावनकुळे हे आज शिरूर लोकसभा दौऱ्यावर आहेत. जेव्हा, शिरूर मधील टोमॅटो उत्पादकांना २०० रुपये भाव मिळत होता, त्याचा चिखल का केलात?. नेपाळमधून टोमॅटो आयात का करण्यात आला? याचे उत्तर चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकऱ्यांना द्यायला हवं. त्याचबरोबर शेतकऱ्यांचा लाखो टन सत्ताधाऱ्यांनी नासवला. निवडणुका, राजकारण, मतांच्या पलीकडे माणसं राहतात….,त्या माणसांचा विचार सत्ताधाऱ्यांनी करायला हवा असा खोचक टोला देखील त्यांनी लगावला आहे.