सातारा : मागील तीन वर्षांमध्ये ऊस देयके व कामकाजासाठी कोणत्याही बँकेचे अर्थसाह्य न घेता शेतकऱ्यांना इतर कारखान्यांच्या बरोबरीने दर दिल्याने शेतकऱ्यांच्या मनामध्ये असलेली किसन वीरची प्रतिमा सहकारातील शिस्तीमुळे उजळ झाली असल्याचे प्रतिपादन खासदार नितीन पाटील यांनी व्यक्त केले.

किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे २०२५-२६ साठी मिल रोलर पूजन सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष कारखान्याचे मार्गदर्शक संचालक खासदार नितीन पाटील व त्यांच्या पत्नी प्रतिमा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.

खासदार पाटील पुढे म्हणाले, की २०२२ मध्ये कारखान्याची सूत्रे संचालक मंडळाने स्वीकारली. त्या वेळी भागभांडवल वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात आलेले होते. त्या वेळी काहींनी आमच्या पाठीमागे निंदानालस्ती केलेली होती. एनसीडीसीकडून दोन कारखान्यांसाठी ४६७ कोटींची रकम मिळालेली होती. सदरची रक्कम ही फक्त कारखान्यावरील कर्ज भागविण्यासाठीच वापरली आहे. काही बँकांच्या रकमा देय आहेत.

मागील तीन वर्षांमध्ये एकाही बँकेचे अर्थसाह्य न घेता आमच्या व्यवस्थापनाने इतर कारखान्यांप्रमाणे दर देत शेतकऱ्यांची आणि इतर देणी दिली आहेत. मागील तीन वर्षांमध्ये शेतकऱ्यांना व्यवस्थित दर मिळाल्याने तेही समाधानी आहेत. त्यांनाही आता ‘किसन वीर’बाबत शाश्वती निर्माण झालेली आहे. सन २०२५-२६ च्या गळीत हंगामात किसन वीर कारखान्याने आठ लाख टनांचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवलेले आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कार्यकर्ते, शेतकरी व कर्मचाऱ्यांनी आपला व आपल्या परिसरातील संपूर्ण ऊस किसन वीर आणि खंडाळा कारखान्याकडेच गळिताला येण्यासाठी सर्वांना प्रेरित करण्याची गरज असल्याचे मतही या वेळी त्यांनी व्यक्त केले. येणाऱ्या तीन हंगामांचे गाळप पूर्ण क्षमतेने झाल्यास शेतकरी व कर्मचाऱ्यांचे सर्व प्रश्न मार्गी लागणार असल्याचा विश्वासही या वेळी खासदार पाटील यांनी व्यक्त केला.

या वेळी कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे म्हणाले, की चालू हंगामात आम्ही मोठ्या अडचणींवर मात करीत सामोरे जात आहोत. ‘एनसीडीसी’मार्फत मिळालेल्या रकमेतून मागील संचालक मंडळाच्या काळातील सन २०२०-२१ मधील जवळपास ६० कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले आहेत. कामगारांच्या मागील सर्व पीएफची रक्कमही जमा केलेली आहे. तसेच मागील शासकीय देणीही दिल्यामुळे कारखान्यास ‘टॉप टॅक्स पेअर’चा बहुमान मिळाला.

शेतकऱ्यांनीही आपला पिकविलेला संपूर्ण ऊस कारखान्यास घालण्याचे आवाहनही या वेळी शिंदे यांनी केले. कार्यक्रमास कारखान्याचे संचालक शशिकांत पिसाळ, बाबासाहेब कदम, दिलीप पिसाळ, सर्व संचालक, राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळस्कर, रामभाऊ लेंभे, महादेव मस्कर, आत्माराम सोनावणे, मनीष भंडारी, कार्यकर्ते, शेतकरी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.