Ladki Bahin Yojana September Month Installment : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही योजना महायुती सरकारने महिलांसाठी सुरू केलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील लाखो पात्र महिलांना दर महिन्याला १ हजार ५०० रुपये दिले जातात. हे पैसे लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होत असतात. आता लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता सप्टेंबर महिना संपला तरी अद्याप जमा झालेला नाही. त्यामुळे सप्टेंबरचा निधी कधी मिळणार? याकडे लाडक्या बहिणींचं लक्ष लागलं होतं.
दरम्यान, आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या नेत्या तथा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडक्या बहिणींना दिवाळीआधीच गुड न्यूज दिली आहे. लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर महिन्याचा निधी कधी मिळणार? याबाबत आदिती तटकरे यांनी एक्सवर (ट्विटर) पोस्ट शेअर करत तारीख सांगितली आहे. लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थी महिलांना सप्टेंबर महिन्याचे १५०० रुपये आजपासून (१० ऑक्टोबर) वितरित करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे. त्यामुळे आता लाडक्या बहिणींची दिवाळी गोड होणार आहे.
आदिती तटकरे यांनी काय म्हटलं?
“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस आजपासून (१० ऑक्टोबर) सुरुवात होत आहे. लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात सन्मान निधी वितरित होणार आहे”, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती !
— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) October 9, 2025
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस उद्या पासून सुरुवात होत आहे. लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित… pic.twitter.com/6e3CgboGVL
‘२ महिन्यांत E-KYC करा, अन्यथा…’
“महाराष्ट्रातील माता-भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे. ही वाटचाल अशीच अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी मागील महिन्यापासून https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर E-KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पुढील २ महिन्यांच्या आत सर्व लाडक्या बहिणींनी E-KYC प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र विनंती”, असं आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे.
ई-केवायसी प्रक्रिया कशी करायची? Ladki Babin Yojana E-KYC Step To Stop Process
१. लाभार्थी महिलांना https://ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत वेब पोर्टलवर जाऊन ई-केवायसी करायची आहे.
२. या प्रक्रियेमध्ये तुम्हाला तुमची काही महत्त्वाची कागदपत्रे आणि माहिती पुन्हा अपलोड करावी लागेल.
३. यात तुमचे नाव, पत्ता, शिधापत्रिका (रेशन कार्ड) क्रमांक, उत्पन्नाची माहिती आणि आधार कार्डची माहिती यांचा समावेश असेल.
४. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या पेजवर लाभार्थी आधार क्रमांक नोंदवावा लागेल. यानंतर कॅप्चा कोड नोंदवा, तो नोंदवताना चूक होणार नाही याची दक्षता घ्या. कॅप्चा कोड नोंदवल्यानंतर आधार प्रमाणीकरणासाठी संमती द्या.
५. आधार प्रमाणीकरण संमती मधील मजकूर वाचून मी सहमत आहे, या पर्यायावर क्लिक करा. यानंतर ओटीपी पाठवा हा पर्याय निवडा, यानंतर आधार लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी मिळेल.
ई-केवायसी कधी पूर्ण करावी?
मंत्री आदिती तटकरे यांनी काही दिवसांपूर्वी एक्स प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य शासन देत असल्याचं म्हणत सर्व लाभार्थी महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, असं आवाहन केलं होतं. येत्या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये सर्व लाडक्या बहिणींना ईकेवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार असल्याची माहिती त्यांनी दिली होती. या योजनेतील १५०० रुपये यापुढेही मिळत राहावे, असं वाटत असल्यास ही प्रक्रिया करणे अनिवार्य असल्याचंही त्यांनी सांहितलं होतं.