अलिबाग- कोकणात गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने जाणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास अधिक सुखकर व सोपा व्हावा, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने महामार्गावर विविध सोयी-सुविधांनी युक्त अशी १० जनसुविधा केंद्रे उभारली आहेत. मात्र या जनसुविधा केंद्रांवर सुविधांचा आभाव असल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे जनसुविधा केंद्रांकडे गणेशभक्तांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात एकूण १० ठिकाणी सुविधा केंद्रे सुरू करण्यात आली असून, पळस्पे फाटा, खारपाडा, खारपाले, वाकण, कोलाड, इंदापूर, माणगाव, लोणेरे, महाड शहर आणि पोलादपूर (लोहारे) येथे ही केंद्रे कार्यरत करण्यात आली आहे.

या जनसुविधा केंद्रांवर पोलीस मदत केंद्र व आपत्कालीन पोलीस मदत टोईंग व्हॅन, क्रेन,वाहन दुरुस्ती कक्ष, टायरमध्ये हवा भरण्याची सोय, वैद्यकीय कक्ष, अॅम्ब्युलन्स सेवा व मोफत आपत्कालीन वैद्यकीय उपचार,बालक आहार कक्ष व महिलांसाठी फिडींग कक्ष, मोफत चहा, बिस्कीट, पाणी व ओ.आर.एस. इत्यादी मिळणार आहेत. रविवार पासून ही केंद्र कार्यान्वित करण्यात आली आहेत. मात्र सोमवारी सकाळी माणगाव येथील जनसुविधा केंद्राला भेट दिली असता, तिथे ना पोलीस उपस्थित होते. ना वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी, त्यामुळे जनसुविधा केंद्रावर येणाऱ्या गणेश भक्तांना चहा पाण्याशिवाय कुठलिच मदत उपलब्ध होत नसल्याचे दिसून आले.

सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे या जनसुविधा केंद्रांवर स्वच्छता गृहांची सोयही उपलब्ध नाही. त्यामुळे गणेशभक्त या ठिकाणी थांबायलाच तयार नाहीत. ज्या उद्देशाने ही जनसुविधा केंद्र कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यांचा काहीच उपयोग जनसामान्यांना होत नसल्याचे दिसून येत आहे. जनसुविधा केंद्रांऐवजी कोकणात जाणारे गणेशभक्त खाजगी हॉटेल्सला पसंती देत असल्याचे आहे. जनसुविधा केंद्रांवर चोविस तास वैद्यकीय अधिकाऱ्यांचे आणि पोलीस पथके तैनात असणे अभिप्रेत आहे. मात्र दोन्ही यंत्रणांचे कर्मचारी माणगाव येथील केंद्रावर सकाळी गैरहजर असल्याचे पहायला मिळाले.

मुंबई गोवा महामार्गावरील आरोग्य पथक 24 तास तैनात राहतील यासाठी निर्देश देण्यात आले आहेत. माणगाव येथे जन सुविधा केंद्रावर आरोग्य पथक आता कार्यान्वित करण्यात आले आहे. – डॉ. मनीषा विखे, जिल्हा आरोग्य अधिकारी