Todays Five Important Decisions Of Mumbai High Court: मुंबई उच्च न्यायालयाने आज अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकने भावाविरोधात दाखल केलेला १०० कोटी रुपयांची भरपाई मागणारा खटला फेटाळला आहे. याचबरोबर अभिनेता सुनील शेट्टीने डीपफेकच्या गैरवापराविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे. तसेच जिओ ट्रेडमार्क आणि बलात्कारातील आरोपीची सुटका करण्याबाबत न्यायालयाने घेतलेल्या पाच महत्त्वाच्या निर्णयांचा आढावा घेऊया.
नवाजुद्दीन सिद्दीकीचा भावाविरोधातील १०० कोटींची मागणी करणारा खटला फेटाळला
अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने त्यांचा भाऊ शमसुद्दीन सिद्दीकी आणि त्यांची पत्नी अंजना पांडे यांच्याविरुद्ध मानहानीच्या आरोपाखाली १०० कोटी रुपयांची भरपाई मिळावी म्हणून दाखल केलेला खटला मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावला आहे. न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांनी हा खटला फेटाळला. पण, आदेशाची सविस्तर प्रत अद्याप उपलब्ध झालेली नाही.
दाव्यानुसार, नवाजुद्दीन सिद्दीकीने २००८ मध्ये त्याच्या धाकट्या भावाला बेरोजगारीमुळे व्यवस्थापक म्हणून नियुक्त केले होते. शमसुद्दीन यांच्याकडे ऑडिटिंग, आयकर रिटर्न भरणे, जीएसटी भरणे इत्यादी कामे देखील होती. पण, शमसुद्दीन यांनी याचा गैरवापर केल्याचा आरोप नवाजुद्दीनने केला आहे.
डीपफेक फोटो आणि व्हिडिओंविरोधा सुनील शेट्टी न्यायालयात
बॉलीवूड अभिनेता सुनील शेट्टीने त्याच्या आणि त्याचे कुटुंबातील सदस्यांचे डीपफेक फोटो आणि व्हिडिओ वापरणाऱ्या अनेक वेबसाइट्स आणि सोशल मीडिया पेजेसवर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने टिप्पणी केली की, सोशल मीडियावर एआयच्या अनियंत्रित वापरामुळे लोक भयानक गोष्टी करू शकतात.
पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे मूकबधीर महिलेवरील बलात्काराच्या आरोपीची सुटका
एका मूकबधीर महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपाप्रकरणी आरोपीला अटक करताना योग्य प्रक्रियेचा अवलंब केला नसल्याचे निरीक्षण नोंदवून उच्च न्यायालयाला त्याच्या सुटकेचे आदेश दिले. तथापि, पोलिसांच्या चुकीचा पीडितेला त्रास नको. तसेच, गुन्हा गंभीर असल्याचे नमूद करून आरोपीला पुन्हा अटक करण्याची परवानगीही न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपीठाने पोलिसांना दिली. आरोपीला जामीन दिलेला नसल्याचेही न्यायालयाने उपरोक्त निर्णय देताना प्रामुख्याने स्पष्ट केले.
कॅब ऑपरेटर्सना ‘जिओ’ ट्रेडमार्क वापरण्यास मनाई
ट्रेडमार्क संरक्षणाच्या एका महत्त्वपूर्ण निर्णयात, मुंबई उच्च न्यायालयाने जिओ कॅब्स नावाखाली सेवा पुरवणाऱ्या कॅब ऑपरेटर्सना रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या मालकीचा ‘जिओ’ ट्रेडमार्क वापरण्यास मनाई केली आहे. ट्रेडमार्क उल्लंघनाचा आरोप करणाऱ्या रिलायन्सने दाखल केलेल्या दाव्यावर न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरेसन यांनी अंतरिम आदेश दिला आहे.
मनाचे श्लोक चित्रपटाच्या प्रदर्शनाला परवानगी
मनाचे श्लोक या मराठी चित्रपटाच्या प्रदर्शनाला उच्च न्यायालयाने गुरूवारी हिरवा कंदील दाखवला. त्यामुळे, चित्रपटाच्या शुक्रवारच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. विशेष म्हणजे, हा निर्णय देताना, जनी निंद्य ते सर्व सोडोनी द्यावे, जनी वंद्य ते सर्व भावे करावे या समर्थ रामदास स्वामींच्या ‘मनाचे श्लोका’तील पंक्तींचा न्यायालयाने प्रामुख्याने संदर्भ दिला.
या चित्रपटाच्या शीर्षकाचे समर्थ रामदास स्वामी यांच्या मनाच्या श्लोकाशी साधर्म्य असले तरी त्याचा मूळ मनाच्या श्लोकांशी काहीही संबंध नाही, असे निरीक्षणही न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती संदेश पाटील यांच्या खंडपीठाने उपरोक्त निर्णय देताना नोंदवले. त्याचवेळी, चित्रपटाच्या सुरुवातीला समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोकांशी चित्रपटाच्या शीर्षकाचा कोणताही संबंध नसल्याची सूचना प्रसिद्ध करण्याचे आदेशही न्यायालयाने निर्मात्यांना दिले.