आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपासंदर्भात चर्चा करण्याकरता आणि अंतिम निर्णय घेण्याकरता आज मुंबईत महाविकास आघाडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला वंचित बहुजन आघाडी सहभागी होणार नव्हती. परंतु, आता या बैठकीला ते त्यांचा प्रतिनिधी पाठवणार आहेत. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी यासंदर्भात एक्सवरून माहिती दिली.

“पुण्यात सत्ता परिवर्तन महासभेचे आयोजन केले असले तरीही मुंबईत होत असलेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत आम्ही आमचा प्रतिनिधी पाठवत आहोत”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

“२ फेब्रुवारीनंतर झालेल्या एकाही बैठक किंवा कोणत्याही कार्यक्रमात वंचित बहुजन आघाडीला आमंत्रण देण्यात आले नव्हते. तसंच, २४ फेब्रुवारीला झालेल्या कार्यकर्त मेळाव्यातही वंचित बहुजन आघाडीला निमंत्रण नव्हते. परंतु, तरीही आम्ही महाविकास आघाडीसाठी सकारात्मक आहोत”, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाे.

“आजच्या महाविकास आघाडीच्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीकडून प्रतिनिधी पाठवण्यात येत आहे. या बैठकीत जागा वाटपासंदर्भात चर्चा व्हावी. २ फेब्रुवारी रोजी मुंबईतील ट्रायडेंट हॉटेलमध्ये पार पडलेल्या बैठकीतही हीच मागणी करण्यात आली होती”, असं आंबेडकर म्हणाले.

दरम्यान, सत्ता परिवर्तन महासभेमुळे वंचित आघाडीकडून महाविकास आघाडीच्या बैठकीला कोणीही जाणार नाही, असं प्रकाश आंबेडकरांकडून कालच स्पष्ट करण्यात आलं होतं. तसंच, ही बैठक २८ तारखेला आयोजित करण्याचीही विनंती करण्यात आली होती. परंतु, ही बैठक आज २७ तारखेलाच आयोजित करण्यात आली. त्यामुळे वंचितने त्यांचा प्रतिनिधी पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

महाविकास आघाडीत वंचितचा समावेश

२ फेब्रुवारी रोजी मुंबईतील ट्रायडंट हॉटेलवर महाविकास आघाडीची बैठक पार पडली होती. या बैठकीत वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत समावेश करून घेण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलं. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली होती. त्याआधी प्रकाश आंबेडकर आणि नाना पटोले यांच्यात राजकीय मतभेद झाले होते. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीला मविआत जागा मिळेल की नाही याबाबत साशंकता होती. परंतु, मतभेद विसरून काँग्रेस, शरद पवार गट आणि ठाकरे गटाने वंचित बहुजन आघाडीला हिरवा कंदील दाखवला आणि महाविकास आघाडीत समावेश करून घेण्यात आले.