अहिल्यानगर/राहाता : कोपरगाव तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या व लहान मुलीसह वृद्धेचा बळी घेणाऱ्या नरभक्षक बिबट्याला वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी काल, शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास धारणगाव शिवारात (ता. कोपरगाव) गोळ्या घालून ठार मारल्याची माहिती सहायक उपवनसंरक्षक गणेश मिसाळ व वनपरिक्षेत्र अधिकारी नीलेश रोडे यांनी दिली.
दरम्यान नगर शहराजवळील निंबळक शिवारात एका लहान मुलीचा बळी घेऊन दुसऱ्या लहान मुलावर हल्ला करणाऱ्या बिबट्याला ठार मारण्यास मुख्य वन्यजीव रक्षक एम. श्रीनिवास रेड्डी यांनी परवानगी दिली आहे. कोपरगाव तालुक्यात गेल्या आठवड्यात बिबट्याने नंदिनी प्रेमदास चव्हाण (वय ३) हिचा बळी घेतल्यानंतर सोमवारी (दि.१०) शांताबाई निकोले (वय ६०) या वृद्धेला ठार केले होते.
कोपरगाव, राहुरी व संगमनेर वन विभागाचे पथक बिबट्याला शोधत होते. नरभक्षक बिबट्या १० दिवसांपासून हुलकावणी देत होता. या बिबट्याला पुण्याच्या दोन शूटरकडून ठार मारल्याने नागरिकांनी अखेर सुटकेचा निःश्वास सोडला. बिबट्याने दोघींचा बळी घेतल्याने संतप्त नागरिकांनी दोनदा रास्ता रोको आंदोलन केले होते.
जनतेचा वाढता दबाव व आजी-माजी आमदारांनी प्रशासनाचे लक्ष वेधल्याने वरिष्ठ स्तरावरून बिबट्याला ठार मारण्यास परवानगी मिळाली होती. नाशिक विभागाचे मुख्य वनसंरक्षक जी मल्लिकार्जुन यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांनी बिबट्याला ठार मारण्यासाठी चोख बंदोबस्त करून ठेवला होता.
हे परिश्रम घेण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल, वनरक्षक, वनमजूर यांनी अहोरात्र पहारा ठेवून रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी केल्याबद्दल परिसरातून सर्वत्र अभिनंदन होत आहे. मात्र, परिसरात असलेल्या इतर बिबट्यांकडून शेतकऱ्यांच्या पशुधनावर हल्ले सुरू आहेत. त्यामुळे इतर बिबट्यांचाही बंदोबस्त करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
काही दिवसांपूर्वी नगर शहराजवळील निंबळक गावच्या शिवारात एका ५ वर्षे मुलीचा बळी घेतल्यानंतर बिबट्याने एका ८ वर्षीय मुलावर प्राणघातक हल्ला केला. पशुधनही या बिबट्याने फस्त केले.
या बिबट्याच्या बंदोबस्तासाठी गाव बंद ठेवण्यात आले होते तसेच रास्ता रोको आंदोलन करत बिबट्याला ठार मारण्याची मागणी करण्यात आली होती. बिबट्याला पकडण्यासाठी विविध पथके तैनात करण्यात आली होती, पिंजरे लावण्यात आले. मात्र हा बिबट्या सातत्याने हुलकावणी देत आहे. नागरिकांच्या मागणीनुसार जिल्हा उपवनसंरक्षन अधिकारी सालविठ्ठल यांनी या बिबट्याला ठार मारण्याचा प्रस्ताव मुख्य वन्यजीव संरक्षक विभागाकडे पाठवला होता. त्यास काल रात्री परवानगी देण्यात आली. हा आदेश ३१ डिसेंबरपर्यंत लागू राहील.
