नागपूर पोलिसांनी अनेक राज्यांमध्ये घरफोडी करणाऱ्या एका हायटेक टोळीला अटक केली आहे. ही टोळी महागड्या कार आणि वॉकी-टॉकी वापरून घरफोड्या करीत होती. या टोळीने केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्येही घरफोडी केल्याची कबुली दिली आहे. या टोळीने २६ जून रोजी नागपुरात चार-पाच ठिकाणी घरफोड्या केल्या. त्याचा तपास करताना नागपूर पोलिसांनी या टोळीच्या मुसक्या आवळल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर घफोडीचा सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपास करताना आरोपी कारमध्ये बसून दुसऱ्या राज्यात गेल्याचं पोलिसांना समजलं. ही टोळी इतर राज्यात जाताना अनेक ठिकाणी कारचा नंबर प्लेट बदलत असल्याची माहितीही पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी या कारचा शोध सुरू केला. यावेळी ही टोळी शनिवारी (९ जुलै) दुपारी काटोल नाक्यावरून जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

पोलिसांनी सापळा रचून आरोपींची गाडी थांबवली. यावेळी आरोपींनी पोलिसांच्या वाहनाला धडक देऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, अखेर पोलिसांनी त्यांना पकडले. या टोळीचा म्होरक्या मध्यप्रदेशातील भोपाळ येथील ३६ वर्षीय अनुप सिंग आहे. सुमारे सात वर्षांपासून तो ही टोळी चालवत होता.

हेही वाचा : नागपूर : ‘आयफोन’ मागणाऱ्या प्रेयसीचा खून

पोलिसांनी आरोपींकडून एकमेकांच्या संपर्कासाठी वॉकी-टॉकीचा वापर, कुलूप तोडण्याची उपकरणे, नंबर प्लेट असा १० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे, अशी माहिती नागपूर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांनी दिली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur police arrest gang of robbers who did crimes in many states pbs