मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडमध्ये सरकार आल्यानंतर ४५० रूपयांना गॅस सिलिंडर देऊ अशी जाहीरातबाजी भाजपाने केली आहे. मग, महाराष्ट्रातील जनतेनं काय पाप केलं आहे? असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपाला विचारला आहे. मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद जाणीवपूर्वक घडवून आणला जात आहे, असा आरोपही नाना पटोलेंनी केला आहे. ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

नाना पटोले म्हणाले, “सरकारला वाद निर्माण करून जनतेचे मूळ प्रश्न विचलित करायचे आहेत. छत्तीसगडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीब ही जात असल्याचं सांगितलं. तेव्हाच कळलं की, देशातील आरक्षण व्यवस्था संपवण्यास सुरूवात झाली आहे. गरीब आणि श्रीमंत या दोनच जाती सरकारला देशात ठेवायच्या आहेत.”

हेही वाचा : अंतर्गत दुफळींमुळे राजस्थानातील निवडणूक अधिक चुरशीची

“मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडमध्ये सरकार आल्यानंतर ४५० रूपयांना गॅस सिलिंडर देऊ अशी जाहीरातबाजी भाजपाने केली आहे. मग, महाराष्ट्रातील जनतेनं काय पाप केलं आहे? महाराष्ट्रात भाजपाचं सरकार आहे. महाराष्ट्रात ४५० रूपयांना गॅस सिलेंडर का देत नाही?” असा प्रश्न नाना पटोलेंनी भाजपाला विचारला आहे.

“उज्ज्वला गॅस योजनेत केवळ २० टक्के सिलिंडर रिफील केली जातात. ही योजना फसली आहे. पण, उज्ज्वला योजनेच्या नावाखाली गरिबांना मिळणारे केरोसिन मात्र भाजपा सरकारने बंद केले आहे. नफा कमावणे हे सरकारचे काम नाही. पण, २०१४ पासून सरकार नफा कमावण्याचे काम करत आहे, जनतेची लूट करून नफा कमावणे हे भयावह आहे,” असेही नाना पटोलेंनी म्हटलं.

हेही वाचा : गॅस सिलिंडर, मोफत लॅपटॉप ते वीमा, राजस्थानमध्ये काँग्रेसच्या जाहीरनाम्यात आश्वासनांचा पाऊस!

“राज्यात मागील काही दिवसांपासून सुरु असलेला मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद जाणीवपूर्वक घडवून आणला जात आहे. भाजपाने मराठा, ओबीसी, धनगर समाजाला जी आश्वासने दिली ती पूर्ण करावीत. कोणाच्या तोंडचा घास हिसावून घेणार नाही हे सरकार म्हणत आहे, तर नेमकं काय करणार हे जनतेसमोर स्पष्ट करावे,” असं आव्हान नाना पटोलेंनी सरकारला दिलं आहे.