लोकसभेच्या निवडणुकीची कोणत्याही क्षणी घोषणा होऊ शकते. त्या दृष्टीने सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील कोल्हापूर या जागेची सध्या चांगलीच चर्चा होत आहे. कारण या जागेवर महाविकास आघाडीकडून श्रीमंत शाहू महाराज छत्रपती उभे राहणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या शक्यतेनंतर सत्ताधारी तसेच विरोधी बाकावरील नेत्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जातायत. दरम्यान, कोल्हापूरच्या याच जागेवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महत्त्वाचं भाष्य केलं आहे. त्यांच्या या भाष्यानंतर शाहू महाराज लोकसभेची ही निवडणूक लढवण्याची दाट शक्यता व्यक्त केली जातेय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नाना पटोले काय म्हणाले?

नाना पटोले २९ मार्च रोजी माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. यावेळी पत्रकारांनी त्यांना कोल्हापूरच्या जागेविषयी प्रश्न विचारला. त्यावर बोलताना आम्ही ही जागा छत्रपती परिवाराला सोडायला तयार आहोत, असं त्यांनी सांगितलं. “राजघराण्यातील किंवा छत्रपती यांच्यातर्फे जे कोणी लढतील त्यांना आम्ही महाविकास आघाडी म्हणून कोल्हापूरची जागा सोडण्यास तयार आहोत. तसेच त्यांना ज्या चिन्हावर लढायचं असेल त्या चिन्हावर ते लढू शकतात,” असं पटोले म्हणाले.

“शाहू महाराजांनी निवडणूक लढू नये”

दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून शाहू महाराज हे कोल्हापूरच्या जागेवरून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे म्हटले जात आहे. तसे संकेतही खुद्द शाहू महाराज यांनी काही दिवसांपूर्वी दिले. २७ फेब्रुवारी रोजी शाहू महाराज एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी तुम्हाला अपेक्षित असलेली ब्रेकिंग न्युज लवकरच येईल. ती फक्त ब्रेकिंग न्युज नसेल जबाबदारी असेल, असे सूचक विधान केले होते. तर शाहू महाराजांच्या याच उमेदवारीवर कोल्हापूरचे नेते हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली. श्रीमंत शाहू महाराजांनी निवडणुकीला उभे राहू नये, असे मत मुश्रीफ यांनी व्यक्त केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nana patole said ready to give ticket to shahu maharaj of kolhapur loksabha seat prd