नांदेड : २०२५ हे वर्ष नांदेड जिल्ह्याच्या दृष्टीने ‘एकीकडे हसू तर दुसरीकडे आसू’ असे परस्परविरोधी ठरत आहे. पावसाळा संपण्यास किमान तीन आठवडे शिल्लक असतानाच जिल्ह्याच्या पर्जन्यमानाने १५ सप्टेंबरपूर्वीच टक्केवारीमध्ये शंभरी पार केली. पुढील काळासाठी ही बाब दिलासादायकच; पण दुसर्या बाजुला वर्ष सरण्यापूर्वीच जिल्ह्यामध्ये शेतकरी आत्महत्यांचेही शतक पूर्ण झाल्याचे दारुण चित्र समोर आले आहे.
आश्लेषा, मघा, पूर्वा आणि उत्तरा या चार नक्षत्रांदरम्यान जिल्ह्याच्या १६ तालुक्यांतील ९३ महसूल मंडळांपैकी बहुसंख्य मंडळांना जबर तडाखे देत वरुणाने यंदा अतिकरुणा केल्यामुळे सबंध जिल्ह्यावर ओल्या दुष्काळाचे सावट पसरले आहे. पण राज्यातील सरकारने या जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकर्यांच्या बाबतीत कुठल्याही प्रकारच्या विशेष मदतीची घोषणा अद्यापही केलेली नाही. सबंध जिल्ह्यावर ओल्या दुष्काळाची घनगर्द छाया पसरली आहे.
जिल्ह्यामध्ये १ जून ते ३१ ऑक्टोबर या कालावधीमध्ये पडणार्या पावसाची सरासरी ८९१ मि.मी. इतकी आहे. पण यंदा १५ सप्टेंबरपर्यंतच ९१६ मि.मी. पावसाची नोंद झाली असून या पावसाची टक्केवारी १०२च्या पुढे गेली आहे. काही तालुक्यांमध्ये तर वार्षिक सरासरीच्या सव्वा ते दीड टक्के इतका पाऊस नोंदला गेला. या अतिपावसामुळे शेतीसोबतच पशुधन आणि मालमत्तांचीही मोठ्या प्रमाणावर हानी झाली. अतिवृष्टी आणि पुरामुळे २१ व्यक्ती आतापर्यंत दगावल्या आहेत. बाधित कुटुंबांची संख्या १६ हजारांवर असून त्यापैकी केवळ ११०० कुटुंबांना मदतीचे वाटप झाले. प्रशासनाकडील नोंदींनुसार ५३१ जनावरे आतापर्यंत दगावली आहेत.
अतिवृष्टीमुळे झालेली दाणादाण समोर आलेली असतानाच १ जानेवारीपासून ते १० सप्टेबरपर्यंत जिल्ह्यातील ११० शेतकर्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. २०१४ पासून प्रशासनस्तरावर शेतकरी आत्महत्यांची नोंद सुरू झाली. २०१५ साली सर्वाधिक म्हणते १९० शेतकर्यांनी आत्महत्या केल्या होत्या. त्यानंतरच्या वर्षांत १८० आत्महत्यांची नोंद झाली. प्रत्येक वर्षी शेतकरी आत्महत्यांचे शतक जिल्ह्यात पूर्ण झाले. यंदा गेल्या ९ महिन्यांत सर्वाधिक आत्महत्या भोकर आणि हदगाव विधानसभा मतदारसंघात (प्रत्येकी २२) झाल्याचे दिसून येते.