नांदेड : भाजपा नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या आगामी नांदेड दौर्यातील पक्षप्रवेशासाठी नांदेडपासून परभणी, जालन्यापर्यंत जाळे फेकण्यात आल्याची चर्चा सुरू झाली आहे. पण नांदेडमधील काँग्रेसचे माजी राज्यमंत्री डी.पी.सावंत यांनी भाजपामध्ये प्रवेश करणार नसल्याचे त्यांनी बुधवारी स्पष्ट केले, तर भाजपाच्या वाटेवर समजले जाणारे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बी.आर.कदम बुधवारी पक्ष कार्यालयात झालेल्या कार्यक्रमास हजर असल्याचे दिसले.
खासदार अशोक चव्हाण यांचे विद्यार्थिदशेतील मित्र ही सावंत यांची पहिली ओळख. मग ते चव्हाण यांचे शैक्षणिक, सांस्कृतिक आणि राजकीय कार्यातील जवळचे सहकारी झाले, तरी गतवर्षी चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर गांधी-नेहरूंची विचारधारा मानणार्या सावंत यांनी काँग्रेसमध्येच थांबण्याचे ठरवले होते. पण स्वपक्षीय नेत्यांनीच त्यांच्यावर अविश्वास दाखविल्यामुळे गेल्या विधानसभा निवडणुकीत ते अलिप्त राहिले.
केंद्रीय गृहमंत्र्यांच्या येत्या २६ तारखेच्या नांदेड दौर्याची खासदार अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जय्यत तयारी चाललेली असताना या दौर्यातील एका मोठ्या कार्यक्रमात काँग्रेसचे मराठवाड्यातील काही माजी आमदार भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर सावंत यांच्याकडे आज थेट विचारणा केली असता त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. परभणी आणि जालना जिल्ह्यातील काँग्रेसचे दोन माजी आमदार अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश घेऊ शकतात, अशी चर्चा येथे होत आहे. तसेच नांदेडच्या एका माजी आमदाराचेही नाव घेतले जात आहे.
खासदार चव्हाण यांनी गेल्या सोमवारी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बी.आर.कदम यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्याशी प्रदीर्घ कालावधीनंतर सविस्तर चर्चा केली. या भेटीनंतर कदम यांच्या भाजपा प्रवेशाच्या बातम्या माध्यमांमध्ये प्रकाशित झाल्या. त्यावर त्यांनी कुठलाही खुलासा नंतर केला नाही. पण माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मृतीदिनानिमित्त बुधवारी सकाळी काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयात झालेल्या अभिवादन सभेस कदम उपस्थित होते. पक्षाच्या नियोजित कार्यक्रमविषयक चर्चेमध्ये त्यांनी भागही घेतल्याचे सांगण्यात आले.
भाजपात बैठकांचा धडाका
केंद्रीय गृहमंत्र्यांच्या दौर्याच्या निमित्ताने खा.अशोक चव्हाण यांनी मागील दोन दिवसांपासून वेगवेगळ्या बैठकांचा धडाका सुरू केला आहे. मंगळवारी दुपारी त्यांनी उत्तर जिल्हा भाजपाच्या प्रमुख पदाधिकार्यांची बैठक घेतली. बुधवारी दुपारी शंकरस्मृती इमारतीतील सभागृहामध्येही एक व्यापक बैठक घेण्यात आल्याचे दिसून आले. अमित शहा यांच्या नियोजित दौर्यातील कार्यक्रमांचा तपशील अद्याप उघड करण्यात आलेला नाही. पण या दौर्यात ते खासदार चव्हाण यांच्या निवासस्थानी भेट देणार आहेत.