छत्रपती संभाजीनगर : नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात झालेल्या मुक्रमाबाद येथे ढगफुटी सदृष्य पडलेल्या पावसामुळे मुक्रमाबाद येथील एक कुटुंब घरासमोर सहा फूट पाणी आले. त्यामुळे मुलांसह रात्री दोन वाजल्यापासून सकाळी सहा पर्यंत घराच्या छतावर बसून त्यांनी रात्र काढली. आता बहुतेकांना बाहेर काढण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दल, शीघ्र कृती दल आणि स्थानिकांनी मिळून अडकलेल्या व्यक्तींची सूचना दिल्या आहेत. आतापर्यंत कोणतीही जीवत हानीची नोंद नाही मात्र पशुधन मोठ्या प्रमाणात वाहून गेले आहे.

लेंडी धरणाच्या पाण्याच्या पातळीत ढगफुटी व अतिवृष्टीमुळे लातूर, उदगीर व कर्नाटकातून आलेल्या पावसामुळे रावनगाव, हसना, भासवाडी, भिंगेली ही गावे पाण्याने वेढली आहेत. जिल्हा प्रशासनाच्या वतीने शोध व बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. बहुतेक नागरिकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्यासह सर्व यंत्रणा अडकलेल्या व्यक्तींना काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत. रावणगाव येथील मशिदीवर १५ ते १६ लोक अडकले असल्याचे आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने कळविले आहे. उदगीर येथून वाहून गेलेल्या कारमध्ये किती जण होते हे समजू शकले नाही.