नांदेड : शंकरराव चव्हाण यांच्यासारख्या कार्यक्षम बांधकाम मंत्र्याची, त्यांच्यानंतर अशोक चव्हाण यांच्या धडाकेबाज कामांची ‘गौरवगाथा’ सांगणाऱ्या नांदेड बांधकाम विभागासह शेजारच्या जिल्ह्यांतील अन्य विभागांनाही गेल्या तीन महिन्यांत जुन्या किंवा नव्या कामांसाठी शासकीय निधी आलेला नसल्याची माहिती या खात्याच्या मंत्र्यांच्या नांदेड दौऱ्यात समोर आली आहे.
मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा नांदेड जिल्हा दौरा बुधवारी दुपारनंतर येथे प्राप्त झाला. एक नव्हे तर दोन दिवसांचा त्यांचा हा दौरा असून, त्यात शुक्रवारी होणारी आढावा बैठक वगळता एकही शासकीय कार्यक्रम नसल्याचे पाहून राजकीय निरीक्षक बुचकळ्यात पडले. त्यानंतर अधिक माहिती घेतली असता, या खात्याच्या सर्वच विभागांच्या तिजोरीत खडखडाट असल्याची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली.
भोसले हे भाजपामध्ये असून, याच पक्षाचे नेते खासदार अशोक चव्हाण यांच्या जिल्ह्यात बांधकाम मंत्री या नात्याने ते पहिल्यांदा आले, तरी चव्हाण यांचे स्थानिक समर्थक व कंत्राटदार प्रथमच आलेल्या मंत्र्याचे स्वागत ज्या धुमधडाक्यात करतात, तो धुमधडाका शिवेंद्रसिंहराजेंच्या आगमनप्रसंगी गुरुवारी सकाळी दिसला नाही. बांधकाम खात्याच्या तीन टोलेजंग विश्रामगृहांची कामे अर्धवट अवस्थेत असल्याचे दृश्य त्यांना येथे आल्याआल्याच बघायला मिळाले. त्यांच्या स्वागताचे काही फलक मात्र लावलेले दिसले.
अशोक चव्हाण यांनी मागील काळात नांदेडमध्ये मुख्य अभियंतांच्या कार्यालयासह विद्युत विभागाचे कार्यालय येथे आणले. त्याशिवाय पूर्वीचे तीन विभाग व अन्य कार्यालयेही नांदेडमध्ये असले, अर्थसंकल्पीय तरतुदीतील एप्रिल ते जून या तिमाहीतील पहिला हप्ता जुलै महिना संपत आला, तरी प्राप्त झालेला नसल्यामुळे प्रस्तावित कामे ठप्प असल्याचे सांगण्यात आले. जी कामे केंद्रीय मार्गनिधी किंवा नाबार्डच्या अर्थसाहाय्यातून मंजूर झाली आहेत ती कामे वगळता कोणतेही काम नव्या आर्थिक वर्षात सुरू करता आलेले नाही.
बांधकाम, जलसंपदा किंवा नगरविकास अशा विकासात्मक कामांशी संबंधित मंत्र्यांचा नांदेड दौरा म्हटले, की एखाद्या नव्या कामाचे भूमिपूजन किंवा उद्घाटन अशी परंपरा राहिलेली आहे. पण शिवेेंद्रसिंहराजे भोसले गुरुवारी सकाळी नांदेडमध्ये आल्यानंतर त्यांनी विश्रामगृहात बराच वेळ भाजपाच्या स्थानिक आजी-माजी पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात घालवला. नंतर जुन्या नांदेडमधील पुरातन किल्ल्याला भेट देऊन ते विश्रामगृहावर परतले. दुपारनंतर भाजपा महानगराध्यक्षांच्या स्थानिक कार्यालयाला त्यांनी भेट दिली. संघ परिवारातील काही महत्त्वाच्या व्यक्तींची त्यांनी भेट घेतली. शुक्रवारी सकाळच्या सत्रात ते नांदेड, परभणी, हिंगोली या तीन जिल्ह्यांतील आपल्या विभागाच्या एकंदर स्थितीचा आढावा घेणार आहेत, असे सांगण्यात आले.
दिवाळीपर्यंत थांबावे लागणार !
नांदेड आणि शेजारच्या दोन जिल्ह्यांतील कंत्राटदारांची हजारो कोटींची देयके बांधकाम खात्याकडे प्रलंबित असून, गेल्या आठवड्यातच कंत्राटदार संघटनेच्या पदाधिकारी यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन प्रलंबित देयकांसंदर्भात निवेदन सादर केले होते. या संघटनेने अन्य काही मागण्याही केल्या आहेत. प्रलंबित देयके व अन्य मागण्यांसाठी या संघटनेचे शिष्टमंडळ बांधकाम मंत्र्यांना शुक्रवारी भेटणार आहे. दरम्यान, कंत्राटदारांची प्रलंबित देयके दिवाळीपर्यंत अदा केली जातील, असे मंत्री भोसले यांनी भाजपाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी बोलताना स्पष्ट केले.