नांदेड : नांदेडच्या १६ तालुक्यांमध्ये आजवर अपेक्षित पावसापेक्षा कितीतरी अधिक पाऊस झाला आहे. ९३ महसूल मंडळांपैकी १६ मंडळांमध्ये १५० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला. केवळ ३ मंडळांमध्ये ८० ते १०० टक्क्यांमध्ये पाऊस आहे. तरी सुद्धा सप्टेंबरअखेर प्रचंड उकाडा असून आणखी पावसाचा अंदाज हवामान खाते वर्तवत आहे.
मागील वर्षीप्रमाणे यंदासुद्धा ऑगस्टच्या मध्यामध्ये नियमित व दमदार पावसाला सुरुवात झाली. तत्पूर्वी तीन वेळा अतिवृष्टीची नोंद आहे. वास्तविक यावर्षी मे पासून आजवर तब्बल १८ वेळा अतिवृष्टी झाली आहे. दोन दिवसांपूर्वी भोकर तालुक्यातील मातुळ व उमरी तालुक्यातील सिंधी येथे अतिवृष्टी झाली. देगलूर तालुक्यातील खानापूर (९३.७ टक्के), शहापूर (८६.७) आणि बिलोली तालुक्यातील सगरोळी (८६.१) वगळता उर्वरित ९० मंडळांमध्ये अपेक्षित पावसाच्या १०० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला.
नांदेड तालुक्यातील नांदेड ग्रामीण (१५० टक्के),. तुप्पा (१५५.८), विष्णुपुरी (१५७.४), तरोडा (१५६.२), मुखेड तालुक्यातील जांब (१५४.४), बाऱ्हाळी १६८.९), कंधार तालुक्यातील कंधार (१६३.३), कुरुळा (१६१.६), दिग्रस (१५०.९), लोहा तालुक्यातील कापसी १५०.३), किनवट तालुक्यातील जलधरा (१६४.३), शिवणी (१६८.६), सिंदगी (१६६.३), मुदखेड (१६८.१), हिमायतनगर (१५५) आणि अर्धापूर तालुक्यातील दाभड मंडळामध्ये १५७.७ टक्के पावसाची नोंद झाली आहे.
अन्य १८ मंडळामध्ये १४० टक्यांपेक्षा अधिक पावसाची नोंद सप्टेंबरचे १० दिवस शिल्लक असताना झाली आहे. २५ मंडळांमध्ये १२५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला असून पावसाळ्याचा अद्याप सव्वा महिना शिल्लक आहे. दररोज कुठे ना कुठे पाऊस पडतो आहे. जिल्ह्यात यावर्षी अद्यापपर्यंत १२७.६२ टक्के पाऊस झाला असून दि. १ जून ते ३१ ऑक्टोबरपर्यंत जेवढा पाऊस पडणे अपेक्षित आहे. त्यापेक्षा ७ टक्के पाऊस अधिक झाला आहे. बिलोली आणि धर्माबाद वगळता उर्वरित १४ तालुक्यांनी पावसाची वार्षिक सरासरी ओलांडली आहे. जिल्ह्यात 31 ऑक्टोबरपर्यंत पडणाऱ्या पावसाची सरासरी ८९१ मि.मी. असते. यंदा १८ सप्टेंबर पर्यंत ९५३ मि.मी. पावसाची नोंद झाली असून हस्त नक्षत्र अद्याप शिल्लक आहे.
उकाडा कायम
शंभर टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस होवूनसुद्धा हवामान खाते आणखी पावसाचा अंदाज व्यक्त करीत आहे. ऑक्टोबर हिटचा सामना करणे शिल्लक असताना सप्टेंबरमध्येच प्रचंड उकाड्याने लोक हैराण झाले आहेत. दररोज सायंकाळी आकाशात ढगांची गर्दी होत आहे. पण, मागील दोन दिवस मात्र कोरडे गेले.