नांदेड : काही आठवड्यांपूर्वी ‘मी भोकरचा, भोकर माझे’ असे जाहीर करत स्वतःला एका विधानसभा मतदारसंघापर्यंत मर्यादित करून घेणारे अशोक चव्हाण यांनी आता जिल्ह्याच्या इतर भागांत सक्रिय होण्याची योजना आखली आहे. पुढील दोन-तीन महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असून, त्यात भाजपला लक्षणीय यश मिळवून देण्यासाठी चव्हाण यांचे नियोजन सुरू झाले आहे. येत्या काही दिवसांत खासदार चव्हाण हदगावचा दौरा करणार आहेत. याच्या पूर्वतयारीची बैठक शनिवारी हदगाव येथे झाली.
भाजपाच्या ग्रामीण भागाच्या दोन संघटनात्मक जिल्ह्यांपैकी उत्तर जिल्ह्यामध्ये चव्हाण यांच्या भोकर मतदारसंघासह हदगाव आणि किनवट मतदारसंघांचा म्हणजे एकंदर ७ तालुक्यांचा समावेश आहे. दक्षिण जिल्ह्यातील काही तालुक्यांत चव्हाण यांना मानणारा गट असला, तरी तूर्त त्यांनी उत्तर जिल्ह्याकडे जास्त लक्ष केंद्रित केले आहे. हदगावचे तालुकाध्यक्ष भागवत देवसरकर यांनी नुकतीच चव्हाण यांची भेट घेऊन चर्चा केल्यानंतर हदगाव दौरा ठरला. अतिवृष्टीनंतर खासदार चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी नांदेड तालुक्यातील काही गावांचा दौरा आखत आपले निकटवर्ती डी. पी. सावंत यांना सक्रिय केले.
पहिल्या टप्प्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची निवडणूक होणार असून, यंदाच्या निवडणुकीत नांदेड जि. प. तसेच नांदेड मनपामध्ये भाजपाचा अध्यक्ष आणि महापौर व्हावा, असा चव्हाण व त्यांच्या समर्थकांचा प्रयत्न आहे. पालकमंत्री अतुल सावे यांच्या मागील दौरामध्ये चव्हाण यांच्या पुढाकारातून एक प्राथमिक बैठक झाली होती. प्रत्येक आमदाराने आपापल्या मतदारसंघांमधील जबाबदारी पार पाडावी, असे त्या बैठकीत ठरले.
राज्यामध्ये भाजपाची शिवसेना आणि ‘राष्ट्रवादी’ या पक्षांसोबत युती असली, तरी या पक्षांच्या स्थानिक नेत्यांचे एकंदर वर्तन, त्यांची वक्तव्ये आणि जाहीरपणे बोलतानाची त्यांची भाषा या बाबी लक्षात घेता, भाजपाला जि.प. आणि मनपाची निवडणूक स्वतंत्रपणे लढावी लागेल, असे दिसत असून, चव्हाणांकडून तशी तयारी सुरू आहे. दरम्यान, नांदेड जिल्हा बँक प्रकरणात भाजपाच्या एका आमदाराने मुख्यमंत्री फडणवीस यांना एक संदेश पाठविला. त्यात जिल्ह्यातील ‘राष्ट्रवादी’च्या आमदाराचे लाड थांबवा, अशी विनंती या आमदाराने केली. पूर्वी भाजपात राहिलेल्या या आमदाराने भाजपात फूट पाडण्याचे उद्योग चालवले, तरी आपली मुख्यमंत्र्यांशी खूप जवळीक असल्याचे या आमदाराकडून भासविले जात आहे.