आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ हे अडीच वर्ष तुरुंगात होते. त्यानंतर त्यांना जामीन मंजूर झाला. मात्र, तशाच प्रकारचा गुन्हा ठाकरे कुटुंबीयांनी देखील केल्याचा खळबळजनक आरोप भाजपा खासदार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. “माझ्याकडे सगळे पुरावे असून मी ईडीपर्यंत सगळी माहिती पोहोचवली आहे”, असं देखील राणे म्हणाले आहेत. शुक्रवारी शिवसेनेतील चार नेत्यांविरोधात ईडीच्या नोटिसा तयार असल्याचं ट्वीट राणेंनी केलं होतं. या पार्श्वभूमीवर आज केलेल्या आरोपांवर तर्क-वितर्क लढवले जाऊ लागले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नारायण राणेंच्या जुहूमधील बंगल्यावर मुंबई महानगर पालिकेनं नोटीस बजावली आहे. बेकायदा बांधकामाबद्दल ही नोटीस बजावण्यात आल्यानंतर नारायण राणेंनी त्यावर खुलासा करण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. आपण १०० टक्के कायदेशीर बांधकाम केल्याचा दावा राणेंनी पत्रकार परिषदेत केला. मात्र, त्यावेळी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप देखील केले.

“नितेश कलाकार बनतोय याचा आनंद, म्याव म्याव…”, नारायण राणेंचा खोचक टोला!

पैसे देऊन मातोश्री २ चं बांधकाम नियमित?

पैसे देऊन मातोश्री २ चं बेकायदा बांधकाम नियमित करण्यात आल्याचा आरोप यावेळी नारायण राणेंनी केला. “शिवसेनेचे प्रमुखच मराठी माणसाच्या मुळावर आले आहेत. त्यांनी एक मातोश्री दुरुस्त केली, मातोश्री पार्ट टू बांधली. आम्ही काही म्हणालो का? भाजपा-शिवसेनेची सत्ता असताना मातोश्री दोनचं बेकायदेशीर बांधकाम पैसे देऊन नियमित केलं”, असा दावा राणेंनी केला आहे.

“माझ्याएवढी माहिती कुणालाही नाही”

“मी ईडीपर्यंत सगळी माहिती पोहोचवली आहे. भुजबळ अडीच वर्ष आत गेले. तसेच गुन्हे मातोश्रीचे आहेत. त्या दोघांचा सीए एकच आहे. माझ्याएवढी माहिती कुणाला नाही. मी इन्कम टॅक्सलाही दोन वर्ष होतो. भुजबळ ज्या गुन्ह्यात अडीच वर्ष तुरुंगात गेले, त्याच गुन्ह्यासाठी हे का नाही तुरुंगात गेले?” असं राणे यावेळी म्हणाले.

Narayan Rane PC : पत्रकार परिषदेत नारायण राणेंची तुफान टोलेबाजी, वाचा नेमकं काय म्हणाले राणे

“आता उभं राहायलाही दोन माणसं लागतात”

दरम्यान, यावेळी बोलताना नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर शेलक्या शब्दांमध्ये निशाणा साधला. “गेल्या सव्वादोन वर्षात शिवसेना कार्यकर्त्यांना काय मिळालं यापेक्षा मातोश्री आणि चमच्यांना काय मिळालं याची आज ना उद्या चर्चा होईल. शिवसैनिक हे सगळं बघत आहेत. भेटणं नाही, दर्शन नाही. मी कुणाच्या आजारपणावर बोलणार नाही. दुसरं कुणी असतं, तर पदावर राहिलं नसतं. राजीनामा दिला असता. आता उभं राहायलाही दोन-दोन माणसं लागतात. या महाराष्ट्रात अशी पाळी कुणावर आली नाही”, अशा शब्दांत नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narayan rane slams uddhav thackeray shivsena on matoshree 2 illegal construction pmw