मुंबई, ठाण्यासह राज्यातील २० हून अधिक महापालिकांच्या निवडणुकांचं घोडामैदान जवळ आलं आहे. एकीकडे विरोधकांनी निवडणूक आयोगावर मोर्चा नेण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे मुंबई, ठाण्यासह पाच महापालिका एकत्र लढण्यावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचं एकमत झालं आहे. ५ जुलैला मराठी विजयोउत्सवाच्या निमित्ताने दोन भाऊ एकत्र आले. त्यानंतर मागील तीन महिन्यांत त्यांच्या सहा भेटी झाल्या आहेत. दरम्यान भाजपा नेत्या नवनीत राणा यांनी राज आणि उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. ठाकरे कुटुंब हे मजबुरीचं नाव आहे असंही त्या म्हणाल्या. तसंच बच्चू कडू यांचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली.
बच्चू कडूंचं नाव न घेता नवनीत राणा यांची टीका
बरेच नौटंकी लोक आहेत जे आज बाहेर फिरून सांगत आहेत आमदारांना मारून टाका… तुम्ही चार वेळा आमदार होते दोन वेळा मंत्री होते तेव्हा शेतकऱ्यांसाठी तुमची पोटदुखी बाहेर नाही आली, असा हल्लाबोल नवनीत राणांनी केला.
नवनीत राणा यांनी राज आणि उद्धव ठाकरेंबाबत काय म्हटलंय?
परिवार एकत्र येणं ही आपली संस्कृती आहे आणि आपण ती जपली पाहिजे… पण आज संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे दोन भाऊ एकत्र आले ते फक्त सत्ता आणि खुर्चीसाठी…सत्तेत आल्यानंतर फक्त पैशासाठी आणि तोड्या करण्यासाठी दोन भाऊ एकत्र आले आहेत. ठाकरे परिवार हे मजबुरीचं नाव झालेलं आहे, असं म्हणत नवनीत राणा यांनी ठाकरे बंधूंवर टीका केली.
सोमवारी काय म्हणाल्या होत्या नवनीत राणा?
बाळासाहेब ठाकरे यांचे जेव्हा निधन झाले, तेव्हा हे दोघे बंधू एकत्र आले असते, तर ते बाळासाहेबांच्या विचारांसाठी एकत्र आले, असा संदेश लोकांमध्ये गेला असता. पण, आज ते एकत्र आले, त्यातून एकच स्वार्थ दिसत आहे. जेव्हा सत्ता हातून निघून जाते, तेव्हा नाईलाजापोटी काही निर्णय घ्यावे लागतात. एकमेकांचे चेहरेही न पाहणारे ठाकरे परिवारातील सदस्य हे एकत्र दीपोत्सव साजरा करीत आहेत. ‘मजबुरी का नाम ठाकरे परिवार’ याच दृष्टीने या दोन्ही नेत्यांकडे बघितले जात आहे. अशी टीका नवनीत राणा यांनी सोमवारी केली होती. दरम्यान आज पुन्हा एकदा राज ठाकरेंवर नवनीत राणांनी टीका केली.
बिहारमध्ये भाजपाचाच मुख्यमंत्री होणार-नवनीत राणा
बिहारमध्ये भाजपाचाच मुख्यमंत्री होणार आहे. काश्मीरमध्ये जेव्हा हल्ला झाला तेव्हा पाकिस्तानला उत्तर दिलं गेलं. पण विरोधकांनी सैनिकांचं कौतुक केलं नाही, मोदींवर टीका केली. विरोधक कमकुवत झाल्याचंच हे लक्षण आहे असंही नवनीत राणा यांनी म्हटलं आहे. आज इथे जमलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना मी दिवाळीच्या शुभेच्छा देते, असंही नवनीत राणा यांनी म्हटलं आहे.