Decline of Naxalite Ideology : गेली ५५ वर्षे जंगलात राहून सरकारविरुद्ध सशस्त्र लढा उभारणाऱ्या नक्षलींचे लोंढेच्या लोंढे आता आत्मसमर्पण करू लागल्याचे दृश्य सुखावणारे असले तरी या चळवळीवर ही परिस्थिती का ओढवली, याचाही विचार व्हायला हवा. विचारधारा आणि शस्त्रे असे दुहेरी अस्त्र घेऊन प्रभाव निर्माण करणाऱ्या नक्षलींच्या या हत्यारांची धार बोथट का झाली? काळानुरूप बदल न करता अंगी बाळगलेला पोथीनिष्ठपणा या पतनासाठी कारणीभूत ठरला का यावर आता चर्चा सुरू झाली आहे.
Naxalism in India : गडावर समर्पणाचे वारे
नक्षलींचा सर्वोच्च नेता भूपतीने अलीकडे गडचिरोलीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आत्मसमर्पण केले. त्याच्याबरोबर एकूण साठ सहकाऱ्यांनी शस्त्रे खाली ठेवली. यानंतर लगेच शेजारच्या छत्तीसगडमध्ये समर्पण करणाऱ्यांची रीघ लागली. तिथे एकाच दिवशी दोनशे नक्षलींनी शरणागती पत्करली. यानंतर अनेक नक्षली गटागटाने अबूजमाड पहाडांवरून खाली येत हाच मार्ग पत्करू लागले आहेत. एकेकाळी हाच पहाडीचा परिसर या चळवळीचा गड होता. आता याच गडावर समर्पणाचे वारे वाहू लागले आहेत. या घडामोडीवर नक्षलींच्या केंद्रीय समितीने एक पत्रक काढून टीका केली व शेवटच्या श्वासापर्यंत लढण्याचा मनोदय बोलून दाखवला असला तरी नक्षलींवर ही सपशेल माघारीची वेळ का आली हा प्रश्न उरतोच.
Naxalism in India : जनाधार गमावल्याने ही वेळ
या चळवळीला संपवण्यात सुरक्षा दलांनी बजावलेली कामगिरी उत्तम असली तरी अलीकडच्या काही वर्षात नक्षलींनी गमावलेला जनाधार सुद्धा या शरणागतीला तेवढाच कारणीभूत आहे. या चळवळीने पाच दशकापूर्वी उपस्थित केलेले जल, जमीन व जंगलाविषयीचे प्रश्न आजही कायम आहेत. उलट ते अधिक उग्र बनले आहेत. तरीही स्थानिक आदिवासी त्यांना साथ द्यायला तयार नाहीत. याचे कारण नक्षलींच्या धोरणबदल न करण्यात दडले आहे.
Naxalism in India : मूलभूत विकासालाही विरोध
दंडकारण्य परिसरातील आदिवासींना सरकार प्रायोजित म्हणजे खाणींचा विकास नको पण मूलभूत गरजा पुरवणारा विकास हवा आहे. त्यालाही नक्षलींनी कायम विरोध केला. या माध्यमातून सरकारची पावले दुर्गम भागात दिसू लागली तर चळवळीच्या प्रभावक्षेत्रावर परिणाम होईल अशी भीती नक्षलींना वाटत होती. जनाधार घटण्यात सुरुवात झाली ती यापासून. या चळवळीचे सरकारविरुद्ध लढण्याचे सूत्र तीन स्तरावर कार्यरत होते. नक्षलींची सशस्त्र सेना, त्यांना गावपातळीवर मदत करणारे जनमिलेशिया व शहरी भागात काम करणाऱ्या समर्थित संघटना. नक्षलींनी सशस्त्र गटांना कायम सुसज्ज ठेवले. त्यामुळे सुरक्षादले व त्यांच्यात नेहमी चकमकी झडत राहिल्या. मात्र हे युद्ध जनतेसाठीच आहे हे जनमिलेशियाला पटवून देत आले नाही. दुर्गम भागातील सामान्य लोकांचे प्रश्न माध्यमातून मांडायचे असेल तर सशस्त्र चळवळीसह लोकशाहीच्या मार्गाने चालणाऱ्या आंदोलनाचाही हातभार हवा. नेमके तेच उभे राहू शकले नाही. दहा वर्षांपूर्वी या आघाडीवर नक्षली कमालीचे सक्रिय होते. नक्षलपुरस्कृत जनआंदोलनामुळे सरकारला अनेक ठिकाणी माघार घ्यावी लागली ती याच सक्रियतेमुळे. नंतर त्यात घट झाली. का याचे उत्तर या चळवळीचे नेतृत्व व सामान
Naxalism in India : सुरक्षा दलांची व्यूहरचना यशस्वी
सुरक्षादलांनी या चळवळीची चहुबाजूने केलेली कोंडीही नक्षलींच्या हालचाली मंदावण्यासाठी कारणीभूत ठरली. त्यामुळे ती हळूहळू आक्रसत जाऊन केवळ अबूजमाड व इंद्रावती राष्ट्रीय उद्यानापुरती मर्यादित झाली. या कोंडीतून मार्ग काढायचा असेल तर शरण जाण्यावाचून पर्याय नाही याची जाणीव नक्षलींना काही वर्षांपूर्वीच झाली. त्यातून सरकारने चर्चा करावी असा सूर समोर आला. काही दशकापूर्वी अविभाजित आंध्रप्रदेशात नक्षलींनी चर्चेचा प्रयोग करून बघितला होता. अर्थात ती फिस्कटली पण यासाठी झालेल्या शस्त्रसंधीदरम्यानचा जो कालावधी मिळाला त्याचा चळवळीने भरपूर फायदा उचलला व नव्या जोमाने लढण्यासाठी ते सज्ज झाले. यामुळे सरकारने यावेळी या चर्चेच्या प्रस्तावाकडे लक्षच दिले नाही. परिणामी शरण येण्यापलीकडे नक्षलींसमोर कोणताही पर्याय शिल्लक उरला नाही.
Naxalism in India : आता पुढे काय?
चहुबाजूनी कोंडी झाली की नेतृत्वाची कसोटी लागते. त्या पातळीवर सुद्धा या चळवळीने अपेक्षाभंग केला. बसवाराजू ठार झाल्यानंतर भूपती, रूपेश सारखे नेतेच समर्पणाच्या चर्चा करू लागल्याने त्यांच्या सान्निध्यात वावरणाऱ्या सशस्त्र सहकाऱ्यांचे मनोधैर्य खचत गेले. आता या दोघांनीही शस्त्रे खाली ठेवल्याने हे सहकारी वाट मिळेल तिकडून शरण येऊ लागले आहेत. सध्याच्या या चळवळीचा प्रमुख देवजी व त्याचे काही मोजके सहकारी आता जंगलात उरले आहेत. सध्या पत्रकातून सरकारला इशारे देणारे हे शेवटचे नक्षली आणखी किती काळ तग धरतात हे बघणे औत्स्युक्याचे ठरणार आहे.
