Chhagan Bhujbal On Pankaja Munde : भारतीय जनता पक्षाच्या नेत्या तथा मंत्री पंकजा मुंडे या ९ फेब्रुवारी रोजी नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर होत्या. यावेळी एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी एक मोठं विधान केलं. “गोपीनाथ मुंडेंवर प्रेम करणाऱ्या लोकांची संख्या एवढी मोठी आहे की एकत्रित केल्यास एखादा पक्ष उभा राहील”, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं. त्यांच्या या विधानानंतर राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आलं. दरम्यान, पंकजा मुंडे यांच्या या विधानावर आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘एका समाजावर पक्ष काढून किती यश मिळेल? याची आपल्याला कल्पना नाही’, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

छगन भुजबळ काय म्हणाले?

“कोणीही स्वतंत्र पक्ष काढू शकतं. आता पंकजा मुंडे म्हणतात त्या प्रमाणे मोठा पक्ष असेल. मात्र, माझं म्हणणं असं आहे की एका समाजावर पक्ष काढणं आणि त्यावर यश मिळवणं हे कितपत यशदायी असेल याची मला कल्पना नाही. मग कोणताही समाज असो, आपल्यासमोर अशी अनेक उदाहरणे आहेत. वेगवेगळ्या घटकांनी वेगवेगळे पक्ष काढलेत. मग ते किती चालले किती नाही याचा लेखाजोखा त्यांनी घेतला पाहिजे. याचा अभ्यास त्यांनी केला असेल. पंकजा मुंडे यांनी तसं म्हटलं असलं तरी त्या लगेच पक्ष काढतील असं मला तरी वाटत नाही. त्यांच्या म्हणण्याचा अर्थ आपण असा घेऊ या की दिवंगत गोपीनाथ मुंडे यांना मानणारा वर्ग मोठा आहे”, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

पंकजा मुंडे काय म्हणाल्या होत्या?

पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे या ९ फेब्रुवारी रोजी नाशिकच्या दौऱ्यावर होत्या. यावेळी एका कार्यक्रमात बोलताना पंकजा मुंडे यांनी एक सूचक विधान केलं होतं. “गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांची संख्या एवढी मोठी आहे की एकत्रित केल्यास एखादा पक्ष उभा राहील”, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या विधानानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळाच चर्चांना उधाणं आलं.

तसेच पंकजा मुंडे यांनी असंही म्हटलं होतं की, “गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणारे आणि पर्यायाने माझ्यावर प्रेम करणारे हे सर्व लोक गोपीनाथ मुंडे यांची मुलगी म्हणून माझ्याबरोबर जोडले गेलेले आहेत. लोक गुणांचा वारसा स्वीकारतात. गुणांवर प्रेम करतात. पण गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणाऱ्यांचा पक्ष उभा आहे. भारतीय जनता पक्षाच्या जन्मापासून गोपीनाथ मुंडे यांनी काम करून पक्ष उभा केला”, असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं होतं. दरम्यान, पंकजा मुंडे यांच्या या विधानानंतर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp ajit pawar group chhagan bhujbal on bjp leader pankaja munde statement to a separate political party will be formed gkt