स्वत:चे सरकार टिकविता आले नाही, तुमच्या नाकाखालून सरकार घेऊन गेलो, असा टोला लगावत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या ‘धाकटय़ा’ (नॅनो) शिवसेनेचा ‘छोटा’ (नॅनो) मोर्चा अशा शब्दांत खिल्ली उडविली. फडणवीसांच्या या टीकेला विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उत्तर दिलं आहे. तसंच मोर्चासाठी पैसे देऊन लोक जमवल्याचा आरोपावरही त्यांनी भाष्य केलं. उपमुख्यमंत्र्यांना नॅनो म्हणायचं आहे की इतर काही याचा त्यांना लखलाभ असा टोलाही त्यांनी लगावला.
भाजपा नेते केशव उपाध्ये यांनी मोर्चासाठी जमलेल्यांना पैसे वाटले जात असल्याचा एक व्हिडीओ ट्विटरला शेअर केला आहे. पैसे देऊन लोक जमवल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आहे. अजित पवार यांना याबद्दल विचारण्यात आलं असता ते म्हणाले की “माझ्या माहितीप्र्माणे अजिबात तसं झालेलं नाही. मी सुरुवातीपासून शेवटपर्यंत मोर्चात होतो. मोर्चा संपल्यानंतरही मी काही काळ तेथील लोकांशी बोलत होतो. अशाप्रकारे काहीही झालं नाही. मला लोक पैसे घेऊन आणलेले दिसले नाहीत. कारण नसताना बदनामी करण्याची गरज नाही”.
“उपमुख्यमंत्र्यांनी नॅनो नाव ठेवावं का स्कूटर ठेवावं हा त्यांचा अधिकार आहे. आम्ही त्याला फार महत्व देत नाही,” असंही ते म्हणाले.
“आम्ही दोन दिवस आधीच देवगिरी बंगल्यावर पत्रकार परिषद घेतली तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, सावित्रीबाई फुले. भाऊराव पाटील या सर्व महापुरुष, स्त्रियांबद्दल जी बेताल वक्तव्यं केली जात आहेत, त्यासाठी इच्छुक नागरिकांनी मोर्चात सहभागी व्हावं असं आवाहन केलं होतं. त्याप्रमाणे नागरिक सहभागी झाले होते,” असं अजित पवार यांनी सांगितलं.
“शिवभक्त आहेस ना, मग महाराजांच्या काळात स्त्रियांचा बाजार…”; संभाजीराजेंचं सुबोध भावेला जाहीर आव्हान
“आमच्या दृष्टीने या मोर्चाच्या निमित्ताने महाविकास आघाडीची एकी दिसली आहे. सहा महिन्यांनी आम्ही असा एकत्र मोर्चा काढला आहे. आम्ही या मोर्चाबाबत समाधानी आहोत,” असंही ते म्हणाले. उपमुख्यमंत्र्यांना नॅनो म्हणायचं आहे की इतर काही याचा त्यांना लखलाभ असा टोलाही त्यांनी लगावला.
