गेल्या दोन महिन्यांपासून महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेल्या फुटीची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. अगदी दोन दिवसांपूर्वीच सुप्रिया सुळेंनी “पक्षात कोणतीही फूट नाही, अजित पवार आमचे नेते आहेत” या केलेल्या वक्तव्यावरूनही तर्क-वितर्कांना उधाण आलं. शेवटी शरद पवारांनी त्यावर “अजित पवारांना पुन्हा संधी नाही” असं म्हणत आपली भूमिका स्पष्ट केली. यादरम्यान शरद पवारांचे मानसपुत्र मानले जाणारे दिलीप वळसे-पाटील यांनी केलेल्या एका वक्तव्यावर बऱ्याच प्रतिक्रिया उमटल्याचं दिसून आलं. त्यासंदर्भात बोलताना शरद पवारांनी थेट दिलीप वळसे-पाटील यांनाच लक्ष्य केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दिलीप वळसे-पाटील हे शरद पवारांचे अत्यंत जवळचे व विश्वासू मानले जात होते. मात्र, अजित पवार गटासोबत जाताना त्यांनी शरद पवारांची उघडपणे साथ सोडल्याचं अवघ्या महाराष्ट्राने पाहिलं. काही दिवसांपूर्वीच दिलीप वळसे पाटील यांनी थेट शरद पवारांच्या राजकीय नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. त्यावरून बरीच चर्चा झाल्यानंतर त्यांनी आपल्या विधानावरून घुमजाव केल्याचंही दिसून आलं. त्याच विधानावरून शरद पवारांनी दिलीप वळसे-पाटील यांचे कान टोचले आहेत.

काय म्हणाले होते दिलीप वळसे पाटील?

दिलीप वळसे पाटील यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना शरद पवारांना स्वबळावर सत्ता आणता आली नाही, अशा आशयाचं विधान केलं होतं. “शरद पवार यांच्या एकट्याच्या बळावर महाराष्ट्रातल्या जनतेने एकदाही राष्ट्रवादीला पूर्ण बहुमत दिलं नाही. शरद पवार पूर्ण बहुमतावर एकदाही मुख्यमंत्री झाले नाहीत. शरद पवार हे उत्तुंग नेते असतानाही राष्ट्रवादीने ठराविक संख्येच्या पुढे मजल मारलेली नाही. पक्षाचे ६० ते ७० आमदार निवडून येतात कुणाशीही तरी आघाडी करावी लागते”, असं वळसे पाटील म्हणाले होते.

“…म्हणून राष्ट्रवादीला पूर्ण बहुमत मिळालं नाही”, रोहित पवारांचं मोठं विधान; वळसे पाटलांना केलं लक्ष्य!

आधी टीका, मग घुमजाव

दरम्यान, या विधानावर स्पष्टीकरण देताना वळसे पाटील यांनी सारवासारव केल्याचं दिसून आलं. “माझं म्हणणं असं होतं की गेली ४० ते ५० वर्षे शरद पवारांनी या राज्यासाठी, देशासाठी काम केलं आहे. देशात अनेक प्रादेशिक पक्ष आहेत. त्यातले अनेक पक्ष स्वतःच्या हिंमतीवर बहुमत मिळवून सत्तेवर बसले आहेत. मात्र महाराष्ट्रातल्या जनतेने अशी शक्ती शरद पवार यांच्या मागे उभी केली नाही याची मला खंत आहे. मी खंत व्यक्त करत होतो”, असं वळसे पाटील म्हणाले.

शरद पवारांची टीका

दिलीप वळसे पाटलांच्या विधानावर टीव्ही ९ शी बोलताना शरद पवार यांनी टीका केली. “मी स्वबळावर मुख्यमंत्री झालो. तीनदा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो. आधी पुलोद स्थापन करून मुख्यमंत्री झालो. दुसऱ्या वेळा काँग्रेससह माझ्या नेतृत्वाखाली निवडणुका लढल्या. ती आम्ही जिंकली. बहुमत आलं. मी मुख्यमंत्री झालो. त्यामुळे यापूर्वीचा राज्याचा इतिहास कुणाला माहिती नसेल तर त्यावर काय भाष्य करायचं?” असा खोचक प्रश्नच शरद पवारांनी उपस्थित केला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp chief sharad pawar on dilip walse patil statement pmw