NCP Conflict over Maharashtra Governor Nominated 12 MLA List : विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ जागांपैकी तीन जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाल्या आहेत. यासाठी महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, माजी खासदार आनंद परांजपे आणि सिद्धार्थ कांबळे यांचा समावेश असण्याची शक्यता आहे. दरम्यान, यावरून रुपाली ठोंबरे-पाटील यांनी रुपाली चाकणकर यांच्या संभाव्य उमेदवारीवरून नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील वाद चव्हाट्यावर आला आहे. या वादावर आता खासदार सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रुपाली पाटील-ठोंबरें या आक्षेप काय?

“एक व्यक्ती एक पद या न्यायानुसार, उपमुख्यमंत्री अजित पवार न्याय नक्की देतील, असा विश्वास आहे. एकाच महिलेला किती पदे देणार? कालपासून बातमी वाचत आहे. बातमीची शहानिशा केली तर पक्षाने कोणतेही पत्र अधिकृत दिले नाही, असे सांगितले. पक्षाला कळकळीची विनंती असेल की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये इतरही महिला आहेत. त्या सक्षमतेने, दमदार कामाने मोठ्या आहेत. पक्षात कर्तुत्वान महिला खूप आहेत. त्या सक्षम, काम करणाऱ्या महिलांचा विचार करावा इतर महिलांना समान संधी द्यावी. ही विनंती असेल”, असं रुपाली पाटील-ठोंबरे यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा >> NCP Ajit Pawar Group : “एकाच महिलेला किती पदे देणार?”, अजित पवार गटात वादाची ठिणगी? रुपाली पाटील-ठोंबरे विरुद्ध चाकणकर वाद चव्हाट्यावर

सुनील तटकरे काय म्हणाले?

राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्य निवडीबाबतची चर्चा अथवा निर्णय अद्याप झालेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे इच्छुकांनी याबाबतचे अर्ज व निवेदने दिलेली आहेत. अजूनही इच्छुक आपले निवेदन किंवा अर्ज पक्षाकडे देऊ शकतात. याबाबत, अद्याप कुठलीही चर्चा संसदीय मंडळात झालेली नाही. पक्षाच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे कोणीही याबाबतचे आपले मत अथवा प्रतिक्रिया प्रसारमाध्यमाकडे देऊ नये.

रुपाली चाकणकरांनी काय प्रतिक्रिया दिली?

रुपाली पाटील-ठोंबरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर प्रतिक्रिया देताना रुपाली चाकणकर म्हणाल्या, “त्यांच्या प्रश्नांवर आमच्या पक्षाच्या प्रवक्त्या उत्तर देतील. मला वाटत नाही की त्यांचे प्रश्न हे उत्तर देण्यासारखे आहेत. आता मला हे सर्व प्रश्न तुमच्याकडून समजत आहेत. त्यामुळे याबाबत मला काहीही माहिती नाही. आमच्या महिला पदाधिकाऱ्यांची बैठक सुरु आहे. त्यामुळे मी काहीही पाहिलेलं नाही. मी त्यांचे प्रश्न पाहते आणि माहिती घेते, त्यानंतर माहिती देते”, अशी प्रतिक्रिया रुपाली चाकणकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp conflict over maharashtra governor nominated 12 mla list sunil tatkare reaction sgk