कोल्हापूर : आमचे काही आमदार बाजूला गेले म्हणून जनाधार गेला असे समजण्याचे कारण नाही. अन्यथा चंद्रशेखर बावनकुळे यांना दारोदारी जाऊन आगामी पंतप्रधान कोण असे विचारण्याची वेळ आली नसती, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शनिवारी येथे लगावला. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी राहुल गांधी यांना बारामतीत आमंत्रित केल्याच्या मुद्द्यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. राहुल गांधींना बारामतीत बोलावल्याने काही फरक पडणार नाही, शरद पवार यांच्या पक्षाचे अस्तित्व राहिले नाही, अशी टीका त्यांनी केली होती. यावर जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
शरद पवार हे एकटेच बारामतीमध्ये सक्षम आहेत. शरद पवार यांच्या नेतृत्वामुळे गेली २५ वर्ष आम्हाला सत्तेत स्थान मिळाले होते. जवळपास १८ वर्षे पक्षातील सर्व प्रमुख हे मंत्री राहिले होते. पक्ष वादात शरद पवार यांची बाजू भक्कम असल्याने शंका घेण्याचे कारण नाही. दुसरी बाजू त्यांच्या मताप्रमाणे दावा करत असली तरी ती टिकणार नाही. आमदार गेले म्हणून पक्ष त्यांच्या मागून जात नाही, असे शिवसेनेच्या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने भाष्य केले आहे. देशातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रतिज्ञापत्रामध्ये शरद पवार यांनाच अध्यक्ष म्हणून मान्यता दिली आहे, असेही पाटील यावेळी म्हणाले.
हेही वाचा : “शरद पवार यांच्याकडे पक्ष राहिलेला नाही”, चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका
महाविकास आघाडीच्या काळात विकेंद्रीत औषध खरेदी करण्याची व्यवस्था होती. पण विद्यमान सरकारच्या काळात संबंधित मंत्र्यांनी ते अधिकार स्वतःकडे घेतलेले आहेत. औषध खरेदीचे महत्त्वाचे निर्णय योग्य वेळेत झाले नसतील, औषधांचा तुटवडा संपूर्ण राज्याला जाणवला असेल. त्यामुळे मंत्रीचं याला जबाबदार आहेत, असे मंत्री तानाजी सावंत हेच म्हणत असतील तर निश्चित मंत्री त्यास जबाबदार असणार आहेत, अशी टीकाही जयंत पाटील यांनी केली.