राष्ट्रवादीचे नेते अजित पवार बंडखोरी करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत. त्यांच्यासोबत ३० ते ४० आमदार असल्याचे म्हटले जात आहे. बंडखोरीनंतर त्यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात आले आहे. अजित पवार यांचे कुटुंबाशी तसेच पक्षांतर्गत मतभेद होते का? असे विचारले जात आहे. यावरच आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी अजित पवार यांना तुम्ही पक्षाचे अध्यक्ष व्हा असे म्हणालो होतो, असे जयंत पाटील यांनी सांगितले आहे. ते आज (२ जुलै) मुंबईत माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“कुटुंबात वाद होण्याचा काही प्रश्नच नव्हता”

अजित पवार यांनी बंड नेमके का केले? त्यांचे परिवारात वाद व्हायचे का? पक्षातील नेत्यांसोबत मतभेद होते का? असे जयंत पाटील यांना विचारण्यात आले. या प्रश्नाचे उत्तर देताना “कुटुंबात वाद होण्याचा काही प्रश्नच नव्हता. पार्टीमध्येही वाद होण्याचा काही प्रश्न नव्हता. कारण मी आणि अजित पवार सोबत बसूनच पक्षाबाबतचे निर्णय घ्यायचो. एखाद्या नेत्याची नियुक्ती करायची असेल तर त्यांच्याशी चर्चा केली जायची. एखाद्या विषयावरून आमच्यात मतभेद निर्माण झाल्यास मोठी बैठक बोलावली जायची,” असे जयंत पाटील यांनी सांगितले.

“तुम्ही प्रदेशाध्यक्ष व्हा, मी विरोधी पक्षनेता होतो”

“अजित पवार यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होण्याची इच्छा व्यक्त केली होती. मला आवठतं की विरोधी पक्षाची निवड करताना, मी त्यांना (अजित पवार) तुम्ही प्रदेशाध्यक्ष व्हा, मी विरोधी पक्षनेता होतो, असे सांगितले होते. एका वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. तेव्हा त्यांना (अजित पवार) विरोधी पक्ष होण्याची इच्छा होती. त्यामुळे हसन मुश्रीफ, छगन भुजबळ यांनी अजित पवार यांनी विरोधी पक्षनेता व्हावे तसेच मी प्रदेशाध्यक्ष व्हावे, असे सुचवले होते,” असे जयंत पाटील यांनी सांगितले.

“शरद पवार निर्णय घेणार होते”

“अजित पवार यांनी नुकतेच मला पक्ष संघटनेत काम करायचे आहे, अशी इच्छा सभेत बोलताना व्यक्त केली होती. अजित पवारांच्या या विधानाचीही शरद पवार यांनी दखल घेतली होती. येत्या ६ जुलै रोजी त्यावर चर्चा करण्यासाठी बैठक बोलवण्यात आली होती. शरद पवार अजित पवार यांच्या मागणीवर काहीतरी निर्णय घेणार होते,” असेही जयंत पाटील यांनी सांगितले. मागील अनेक वर्षांपासून मी आणि अजित पवार यांनी सोबत काम केलेले होते. आमच्यात वाद होण्याचा प्रश्न नव्हता, असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

अजित पवारांच्या बंडाला शरद पवारांचा पाठिंबा नाही

दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आमचा अजित पवार यांच्या बंडखोरीला पाठिंबा नाही, असे सांगितले आहे. तसेच आमचा जनतेवर विश्वास आहे, असेही शरद पवार म्हणाले आहेत. ते लवकरच संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp leader jayant patil said no clash with ajit pawar offered party president post year before prd