गेल्या काही दिवसांपासून राज्यात संजय राऊतांनी केलेल्या एका विधानाची जोरदार चर्चा चालू आहे. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार फेब्रुवारी महिन्यात कोसळेल, असा दावा संजय राऊतांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकीय वर्तुळात नेमक्या काय घडामोडी घडत आहेत, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलताना यावर सूचक विधान केलं आहे. तसेच, यावेळी शरद पवारांनी छत्रपती संभाजी महाराजांचा धर्मवीर उल्लेख, बिहारमधील जातीवर आधारित जनगणना अशा मुद्द्यांवरही भूमिका मांडली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“छत्रपती शिवाजी महाराजांनंतर या राज्यावर इतके हल्ले झाले. त्या हल्ल्यांना समर्थपणे तोंड देण्याचं काम संभाजी महाराजांनी केलं. हा इतिहास आहे. त्यामुळे त्यांना स्वराज्यरक्षक म्हणणं यात फारसं काही चुकीचं नाही. त्यावर वाद करण्याचंही काही कारण नाहीये”, असं शरद पवार यावेळी म्हणाले.

“महाराष्ट्राचे ‘पोलिटिकल कपल’ राज्यपालांशी…”, संजय राऊतांचा शिंदे-फडणवीसांवर टीकास्र, ‘त्या’ भेटीचा केला उल्लेख!

“ही मागणी आम्ही फार वर्षांपासून करतोय”

दरम्यान, बिहारमध्ये सुरू झालेली जातीवर आधारित जनगणनेची मागणी आपण गेल्या अनेक वर्षांपासून करत आहोत, असं शरद पवार म्हणाले.”अशी जनगणना करावी, ही मागणी आम्हा सगळ्यांची गेली अनेक वर्षं आहे. सातत्याने आम्ही ती करतोय. समाजातील लहान घटक असला, तर त्याची नेमकी संख्या किती, स्थिती काय या गोष्टींचं मोजमाप एकदा झालं पाहिजे. त्यांना वर आणण्यासाठी वेगळे कार्यक्रम केले पाहिजेत. त्यासाठी ही जनगणना आवश्यक आहे असा विचार आम्ही लोकांनी मांडला आहे. मला आनंद आहे की नितीश कुमारजी यांनी त्याची अंमलबजावणी करायला सुरुवात केली”, असं शरद पवार म्हणाले.

“राज्यपालपदाने पदरात दुःखच पडलं”, कोश्यारींच्या वक्तव्यावर शरद पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया, उपस्थितांमध्ये एकच हशा

सरकार कोसळेल का?

यावेळी संजय राऊतांच्या विधानावरही शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. “राज्यातील शिंदे सरकार फेब्रुवारी महिन्यात कोसळेल. हे सरकार फेब्रुवारी महिना पाहणार नाही”, अशा आशयाची विधानं संजय राऊतांनी केली आहेत. याबाबत पत्रकारांनी विचारणा केली असता शरद पवारांनी त्यावर सूचकपणे मिश्किल टिप्पणी केली. “त्यांचं नेमकं काय नियोजन आहे याबद्दल आता मी गेल्यावर त्यांच्याकडून जाणून घेईन. त्यांचं काही नियोजन असेल, तर त्याबद्दल मला फारशी काही माहिती नाही”, असं शरद पवार यावेळी म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp sharad pawar on shivsena sanjay raut claim shinde government collapse in feb pmw