Jitendra Awhad on Santosh Deshmukh case: बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात राज्य सरकारने नेमलेल्या एसआयटीमध्ये वाल्मिक कराडच्या जवळचे पोलीस अधिकारी असल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड आणि खासदार बजरंग सोनवणे यांनी केला आहे. तसेच या प्रकरणी बजरंग सोनवणे यांनी मानवाधिकारी आयोगाकडेही तक्रार दाखल केली आहे. वाल्मिक कराडचे मित्र असलेले पोलीस अधिकारी निष्पक्ष चौकशी कशी करणार का? असा सवाल आता विरोधक उपस्थित करत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जितेंद्र आव्हाड, खा. सोनवणे आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी वाल्मिक कराडचा एक फोटो एक्सवर शेअर केला आहे. ज्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) महेश विघ्ने आणि वाल्मिक कराड एकत्र दिसत असल्याचा आरोप केला जात आहे. २३ नोव्हेंबर २०२४ रोजी विधानसभेचा निकाल लागला होता. त्यादिवशी धनंजय मुंडेंच्या विजयाचा जल्लोष साजरा करतेवेळी हा फोटो काढण्यात आल्याचा दावा केला जात आहे. या फोटोवरून वाल्मिक कराड आणि पीएसआय महेश विघ्ने यांचे जवळचे संबंध असल्याचे बोलले जात आहे.

हे वाचा >> “बेभान सुटलेला बैल…”, फडणवीसांचा उल्लेख करत अमोल मिटकरींची सुरेश धसांवर टीका

एसआयटीमध्ये महेश विघ्नेंचा समावेश

संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी नेमलेल्या एसआयटीमध्ये हेच महेश विघ्ने असल्याचा आरोपही करण्यात येत आहे. जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले, “संतोष देशमुख प्रकरणात शासनाने नेमलेल्या SIT मधे एक प्रमुख IPS बाहेरील नेमला आहे. त्यांच्याखाली दिलेले अधिकारी हे वाल्मिकचे पोलीस आहेत. यातील एक PSI महेश विघ्ने पाहा. धनंजय मुंडे निवडून आल्यावरचा फोटो आहे. किती जवळचे अन् प्रेमाचे संबध आहेत पहा. हे असले अधिकारी वाल्मिकला शिक्षा देतील की मदत करतील? याच विघ्ने याने निवडणूक काळात धंनंजय मुंडेंचा कार्यकर्ता असल्याप्रमाणे काम केलेले आहे.”

याचबरोबर जितेंद्र आव्हाड यांनी दुसराही एक फोटो पोस्ट केला आहे. याबद्दल माहिती देताना ते म्हणाले, “दुसरा मनोजकुमार वाघ हा वाल्मिक कराडचा अत्यंत खास माणूस असून गेली १० वर्षे तो बीड LCB मध्येच आहे आणि वाल्मिकसाठी काम करतोय.”

संतोष देशमुख हत्या प्रकरणात आवाज उठविणाऱ्या अंजली दमानिया यांनीही पीएसआय महेश विघ्ने यांचा फोटो एक्सवर शेअर करत तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनीही हाच आरोप केला आहे. वृत्तवाहिनीशी संवाद साधत असताना बजरंग सोनवणे म्हणाले की, विधानसभा निकाल लागला त्यादिवशी महेश विघ्ने आणि वाल्मिक कराड यांनी एकत्र विजयाचा आनंद साजरा केला होता. संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी नेमलेल्या एसआयटीमध्ये महेश विघ्ने यांचा समावेश करण्यात आला आहे. जर आरोपीचा मित्रच तपास करणार असेल तर किती चांगल्या पद्धतीने चौकशी केली जाईल, याचा विचार केला पाहीजे, अशी टीका त्यांनी केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncpsp leader jitendra awhad post police photo with walmik karad and raise question on sit investigation kvg