संभाजीराजे छत्रपती यांना शिवसेनेकडून राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी देण्याच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकारण आरोप प्रत्यारोपांमुळे तापलेलं असतानाच रविवारी शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी कोल्हापूरचा दौरा केला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी श्रीमंत शाहू महाराज यांची भेट घेऊन या विषयावर चर्चा केली. त्यानंतर राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये आपली भूमिका स्पष्ट करतानाच विरोधकांवर निशाणा साधला. मात्र या साऱ्या घटनाक्रमावर भाष्य करताना भाजपाचे आमदार नितेश राणे यांचा तोल सुटला आहे. पत्रकारपरिषदेमध्ये संजय राऊतांवर टीका करताना नितेश राणेंनी राऊत यांची तुलना शाहू महाराजांच्या कुत्र्याशी केलीय.

नक्की वाचा >> “भाजपानेच संभाजीराजेंची कोंडी केली, राजे फडणवीसांना भेटले व पाठिंब्यासाठी…”; राज ठाकरेंचाही उल्लेख करत शिवसेनेचा हल्लाबोल

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोल्हापूर दौऱ्यावर असणाऱ्या नितेश राणेंनी सोमवारी सांयकाळी पत्रकारपरिषद घेतली. यावेळी त्यांना संजय राऊतांनी केलेल्या कोल्हापूर दौऱ्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना नितेश राणेंनी संजय राऊत आता छत्रपतींच्या घरामध्ये आग लावण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप केला. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये आग लावण्याचं काम करणाऱ्या लोकांमध्ये संजय राऊतही होते असं म्हणत नितेश राणेंनी राऊतांवर निशाणा साधलाय.

संजय राऊत यांचा एकेरी उल्लेख करत अशा लोकांना सुरक्षारक्षकांची गरज नाही असं म्हणताच आता संजय राऊत छत्रपतींच्या घरात आग लावण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप नितेश यांनी केलाय. “हा काल ठाकरेंच्या घरात आग लावत होता आज छत्रपतींच्या घरापर्यंत पोहचण्याची याची मजल गेलीय. म्हणून कधीतरी त्यांच्या आजूबाजूच्या बॉडीगार्डला १० मिनिटं सुट्टी दिली पाहिजे किंवा सुट्टीवर पाठवा. अशा लोकांना अंगरक्षकांची गरज नाही. थोडा मराठा समाजाने त्याचा ताबा घेतला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. ज्या बाळासाहेब ठाकरेंच्या घरी त्याने आग लावली आज छत्रपतींच्या घरी आग लावलेली आहे,” असं नितेश राणे म्हणालेत. “हा जो आग लावण्याचा इतिहास आहे. ही आग लावण्याची हिंमत संजय राऊत करतोय हे कधी ना कधीतरी त्याला मोजायला लागणार हे मी तुम्हाला नक्की सांगतो,” असंही नितेश राणेंनी म्हटलंय.

नक्की वाचा >> “किरीट काकांना राज्यसभेवर न घेतल्याने भारतातील सामान्य जनता…”; सोमय्यांचा हसरा फोटो शेअर करत NCP च्या मिटकरींचा टोला

नितेश राणे यांचा राऊतांवर टीका करताना तोल सुटल्याचं पहायला मिळालं. नितेश यांनी खासदार असणाऱ्या संजय राऊतांची तुलना शाहू महाराजांच्या श्वानाशी केली. “शाहू महाराजांचं मी खरंच कौतुक करीन की त्यांनी अतिशय योग्य जागी त्यांनी संजय राऊतांना बसवलं. कसंय एका बाजूला त्यांचा कुत्रा बसलेला दुसऱ्या बाजूला संजय राऊत बसलेला. बरोबर जागी त्यांना ते स्थान बरोबर दिलं. एक त्याचा पालतू होता. दुसरा कोणाचा पालतू आहे उभ्या महाराष्ट्राला माहितीय. कोणाच्या बिस्कीटावर नाचतो तो. म्हणून त्यांनी बरोबर स्थान दिलं त्याला,” असं नितेश राणे राऊत यांचा एकेरी उल्लेख करत म्हणाले.

देवेंद्र फडणवीसांनी शब्द दिला असता तर संभाजीराजेंना नक्कीच त्यांनी निवडून आणलं असतं असंही नितेश राणे म्हणाले. “संभाजीराजेंना जो मानसन्मान भाजपाने दिलाय, देवेंद्र फडणवीसांनी दिलाय, पंतप्रधान मोदींनी दिलाय, अमित शाहांनी दिलाय. कधी संभाजीराजेंना विचारा त्यांच्या सहा वर्षाच्या खासदारकीमध्ये त्यांना काय मानसन्मान दिलाय. उद्या देवेंद्र फडणवीसांनी त्यांना शब्द दिला असता की चला तुम्हाला खासदारकी देतो किंवा तुम्हाला अपक्ष म्हणून निवडून आणतो. १०१ टक्का निवडून आलं असतं. त्याला देवेंद्र फडणवीस म्हणतात, उद्धव ठाकरे म्हणत नाही. शब्द फिरवणारा त्याला उद्धव ठाकरे म्हणतात,” अशी टीका नितेश राणेंनी केलीय.

नक्की वाचा >> आव्हाडांनी केली शाहू महाराज आणि शरद पवारांची तुलना; ‘बहुजनवाद विरुद्ध मनूवाद’ मथळ्याखालील पोस्टमध्ये म्हणाले, “सनातनी आणि…”

नितेश राणे यांनी पुढे बोलताना, उद्धव ठाकरेंनी शब्द फिरवणे “हे काय नवीन नाहीय. कुठलाही ज्याला शिवसेनेचा इतिहास माहितीय, राणेंना विचारा, राज ठाकरेंना विचारा ज्यांनी जुनी शिवसेना पाहिलेलीय. प्रत्येकजण बोलेल की हा माणूस असाच आहे. शब्द फिरवण्यात आणि खोटं बोलण्याचा उद्धव ठाकरेंचा इतिहासच आहे. नवीन काय आहे त्यामध्ये? तो माणूस असाच आहे. आज महाराष्ट्राला त्याची ओळख होते. संभाजीराजेंनी त्याच्यावर विश्वास करण्याआधी दोनदा विचार करायला हवा होता. उद्धव ठाकरे म्हणजे देवेंद्र फडणवीस नाहीत,” असंही नितेश राणे म्हणालेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nitesh rane slams sanjay raut comparing him with shahu maharaj dog scsg
First published on: 31-05-2022 at 09:00 IST