अहिल्यानगर:ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांच्या वाहनावर आज, शनिवारी सकाळी नगर शहराजवळ हल्ला करण्यात आला. यामध्ये त्यांच्या ताफ्यातील दोन वाहनांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने यामध्ये लक्ष्मण हाके यांना कोणतीही इजा झाली नसल्याचे समजले. या घटनेने नगर शहरात खळबळ उडाली. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी यासंदर्भात तिघांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती दिली. दरम्यान मी ओबीसी समाजाची बाजू मांडतो, ओबीसी आरक्षणासाठी लढतो म्हणून माझ्यावर ठरवून हल्ले केले जात असल्याची प्रतिक्रिया हाके यांनी लोकसत्ताशी बोलताना दिली.
ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांची आज पाथर्डी तालुक्यातील निंबादैत्य नांदूर येथे सभा आहे. या सभेसाठी ते पाथर्डीकडे जाण्यासाठी दौंड रस्त्याने आज सकाळी येत होते. नगर शहराजवळ खंडाळा ते अरणगाव यादरम्यान त्यांच्या वाहनांचा ताफा काहीकाळ थांबला असता त्यावर काही तरुणांनी हा हल्ला केला. या घटनेनंतर लक्ष्मण हाके बाह्यवळण रस्त्याने पाथर्डीकडे रवाना झाले.
दरम्यान हाके यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हा माझ्यावरील नववा हल्ला आहे. मी ओबीसी समाजाची बाजू मांडतो, ओबीसी आरक्षणासाठी लढतो म्हणून माझ्यावर हल्ले होत आहेत, असे सांगितले.ते म्हणाले, की आज सकाळी आठ ते दहा जणांनी काठ्या व बांबूने हल्ला केला. त्यामध्ये माझ्या वाहनाच्या पाठीमागील बाजूची काच फोडली तर दुसऱ्या वाहनाच्या चालकाच्या बाजूची काच फोडण्यात आली. दोघा कार्यकर्त्यांना मुका मार लागला आहे.
नगर तालुका पोलिसांशी संपर्क केला असता त्यांनी या घटनेला दुजोरा देत कारवाई सुरू असल्याची माहिती दिली. सातारा जिल्ह्यातील लोणंद येथेही काही दिवसांपूर्वी हाके यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला होता तसेच त्यांच्या एका जवळच्या कार्यकर्त्यावर बीड येथे नुकताच हल्ला झाला आहे.